तरुणीचा संशयास्पद मृत्यू; चाैकशीवेळी पतीने केला पुरूष नसल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

कोलगाव-कासारवाडी येथे आज सकाळी नऊच्या दरम्यान इंदुलकर यांच्या घराशेजारील विहिरीत एका तरुणीचा मृतदेह तरंगत असताना दिसला. संबंधित तरुणी कोलगाव-भोमवाडीतील एका महिलेच्या घरी गेले काही दिवस राहत होती.

सावंतवाडी -  एका विहिरीत कोलगाव-कासारवाडी येथे तरुणीचा मृतदेह आढळला. दर्शना गवस (वय 26, रा. झोळंबे, ता. दोडामार्ग) असे तिचे नाव आहे. तिच्या नातेवाइकांनी येथे धाव घेत तिने लग्न केले होते, असे सांगत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यांनी पती म्हणून दाखवलेल्या व्यक्तीने आपण पुरुष नसून महिला असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली. नातेवाइकांनी या प्रकारास जबाबदार संशयितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. 

याबाबत अधिक माहिती अशी - कोलगाव-कासारवाडी येथे आज सकाळी नऊच्या दरम्यान इंदुलकर यांच्या घराशेजारील विहिरीत एका तरुणीचा मृतदेह तरंगत असताना दिसला. संबंधित तरुणी कोलगाव-भोमवाडीतील एका महिलेच्या घरी गेले काही दिवस राहत होती. या प्रकाराची माहिती माजी सरपंच संदीप हळदणकर यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. येथील पोलिस ठाण्यात याबाबत गोविंद माईणकर याने खबर दिली असता आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. 

दरम्यान, सायंकाळी या प्रकाराची माहिती समजल्यानंतर दर्शना हिचा भाऊ व इतर नातेवाईक येथे दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे प्रकरणाला वेगळेच वळण लागले. हा घातपात असल्यामुळे यातील दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका दर्शनाच्या नातेवाइकांनी घेतली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दर्शना नोकरीसाठी गोव्याला जायची. अलीकडे तिने घरच्यांशी संपर्क कमी केला होता. शेवटचा संपर्क 15 ऑगस्टच्या दरम्यान झाला होता. तिने लग्न केल्याचे आपल्या चुलत बहिणीला सांगितले होते. आपण पतीसोबत कोलगाव येथे राहत असल्याचेही तिचे म्हणणे होते. या प्रकाराने नाराज कुटुंबाचाही दर्शनाशी फारसा संपर्क नव्हता. 

गेले दहा महिने दर्शना कोलगाव येथे तिच्या मैत्रिणीकडे राहायची. घराकडून तिच्या भावाने विचारणा केली असता आपले लग्न झाले असून, आपण घरी येणार नसल्याचे तिने सांगितले. तिने आपल्या चुलत बहिणीला आपण पप्पू नामक व्यक्तीशी लग्न केल्याचे सांगितले. तिच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार दर्शना हिच्याशी शेवटचा संपर्क 15 ऑगस्टला झाला होता. त्यापूर्वी काही वेळा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पती म्हणून भासणारा पप्पू याने संपर्क होऊ दिला नाही. चुलत बहिणीला त्या पप्पू व आपला एकत्र फोटोही पाठवला होता.

आज सकाळी तिच्या मृत्यूची बातमी समजताच दर्शनाचा भाऊ महेश गवस व झोळंबे ग्रामस्थांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयकडे धाव घेतली. मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर तिचा भाऊ व ग्रामस्थांनी मृतदेह पाहताच आश्‍चर्य व्यक्त केले. तिने आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. मृतदेहाच्या तोंडाकडे फेस होता. यामुळे हा घातपातच आहे, असे सांगत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी पोलिसांना दिला.

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांनी मृतदेह ताब्यात घेण्याबाबत तिच्या भावाला विनंती केली; मात्र ग्रामस्थांनी त्यांची विनंती धुडकावून लावत वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी दर्शनाचा मृत्यू हा प्रथम दर्शनी बुडून झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

या दरम्यान दर्शनाची चुलत बहीण येथे पोहोचली. तिने आपण दर्शनाच्या त्या पप्पू नामक पतीला ओळखत असल्याचे सांगितले. तेथेच असलेल्या पुरुष वेशातील एका व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. यावेळी चुलत बहिणीने हाच पप्पू असल्याचे सांगितले; मात्र त्या पुरुष वेशातील व्यक्तीने आपण पुरुष नसून स्त्री असल्याचे सांगत आपण दर्शनाचा पती कसा असणार, असा पवित्रा घेतला. या प्रकाराने पोलिसही चक्रावले आहेत. 

दर्शना ज्याठिकाणी ज्या घरात तिच्या मैत्रिणीकडे राहायची तसेच तिने त्या घरातील पुरुष वेश्‍यात वावरणाऱ्या पप्पू नामक महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले. उशिरापर्यंत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. पोलिसांकडून चौकशी सुरू होती. त्या पप्पू नामक पुरुष वेशातील महिलेची सखोल चौकशी केल्यानंतरच या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फुटणार असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. 

याप्रकरणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, पंचायत समिती सदस्य मेघश्‍याम काजरेकर, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे, प्रेमानंद नाडकर्णी, पराग गावकर, रमाकांत देसाई, माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर यांच्यासह नातेवाईक तसेच अमोल सरंगळे, व्ही. जी. नाईक, श्री. गवस आदी पोलिस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनाचे नातेवाईक आणि भाऊ हे येथील पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected Death of Young Girl In Kolgaon Sindhudurg