‘सुयश’ने केली वडिलांची स्वप्नपूर्ती

‘सुयश’ने केली वडिलांची स्वप्नपूर्ती

सावर्डे - प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याला आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास अशक्‍य गोष्ट शक्‍य करता येते. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि अपार कष्टाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी रियो येथे झालेल्या पॅराऑलिंपिक जलतरणमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूरच्या सुयश जाधवकडे पाहिल्यावर कळते.

अपघातात दोन हात गमावलेल्या सुयशच्या अंतरंगात नजर टाकली असता त्याची करुण आणि प्रेरणादायी कहाणी समोर आली. डेरवण येथे पॅरा ॲथलेटिक्‍स राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने आलेला सुयश ‘सकाळ’शी बोलत होता. 

वयाच्या अकराव्या वर्षी मोठ्या भावाच्या लग्नात खेळत असताना विजेच्या धक्‍क्‍याने त्याचे दोन्ही हात निकामी झाले. कुटुंबावर आभाळ कोसळले. वडील शिक्षक आणि जलतरणपटू आहेत. कबड्डी, खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या माझ्या बाबांनी मला तीन वर्षांचा असताना जलतरणाचे धडे दिले होते. त्यांनी मला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पप्पांनी मला प्रेरणा दिली. माझे हात गेले तरी मी जिद्द सोडली नाही. शाळेत जाऊन क्‍लिप घालून पेपर लिहिले. शाळेत यश मिळत गेले. 

बंगळूर येथे २००९ मध्ये झालेल्या अपंगांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच जलतरण स्पर्धेत कमी सराव करून मिळालेले बक्षीस माझ्या जीवनाला वळण देणारे ठरल्याचे सुयश सांगतो. मायकेल फिल्प्स याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे सांगताना सुयश म्हणाला, की कोणताही खेळ असल्यास एकाग्रता, ध्येय, सराव, सातत्य आणि आत्मविश्‍वास असणे गरजेचे आहे. 

रियोमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून अनेक बारकावे शिकायला मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना आणखी काही गरजांची पूर्तता होणे आवश्‍यक आहे. नवनवीन तंत्र शिकायला मिळते. यंदा सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपली निवड झाली असून पुढील ऑलिंपिकसाठी आपण मोठ्या ताकदीने उतरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com