आरोग्यचा कारभार : स्वॅब घेतलेल्या ट्यूब फुटल्या , आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या त्या ४० जणांची केली होती तपासणी....

तुषार सावंत | Saturday, 25 July 2020

२० जणांचे नमुने पुन्हा घेण्याची नामुष्की

ओरोस (सिंधुदुर्ग) : आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्याने गुरुवारी कणकवली येथील सुमारे ४० जणांचे कोरोना चाचणीकरिता नमुने घेण्यात आले होते; मात्र नमुने घेतलेल्या २० ट्यूब फुटल्या. त्यामुळे या २० जणांचे स्वॅब  ( २५) पुन्हा घेण्याची नामुष्की जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर ओढवली.

राजकीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने संपर्कातील लोकांची संख्या वाढली आहे. आमदार नाईक यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध गेले दोन-तीन दिवस सुरू आहे. यातील (२३) कणकवली येथील सुमारे ४० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते; मात्र, यातील २० ट्यूब फुटल्या. आज नमुने देण्यासाठी ४० ते ५० व्यक्ती गेल्या होत्या; मात्र आरोग्य विभागाकडे नमुने घेण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ट्यूब उपलब्ध नसल्याने त्यांना सायंकाळपर्यंत ताटकळत राहावे लागले. आरोग्य विभागाच्या या कारभाराबाबत कणकवलीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आणखी ३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्तची संख्या २४९ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३०५ कोरोना बाधित सापडले असून यातील ५२ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

हेही वाचा- या गावाने सूचनांचे केले काटेकोर पालन मात्र , अखेर त्याने केला शिरकाव... -

जिल्ह्यात ( २३) सायंकाळपर्यंत कोरोनाबाधित संख्या २९६ होती; मात्र रात्री उशिरा ११ बाधित सापडल्याने बाधितांच्या संख्येने तीनशेचा टप्पा पार केला. रुग्ण संख्या ३०७ झाली. नव्याने मिळालेल्या या रुग्णांत कणकवली तीन, कुडाळ पाच, सावंतवाडी दोन, तर दोडामार्ग एक अशा प्रकारे समावेश आहे. कणकवली शहर दोन आणि कलमठ एक, असे कणकवलीत रुग्ण मिळाले आहेत. कुडाळ शहर एक, वर्दे तीन, तर अणाव-हुमरमळा एक रुग्ण मिळाला आहे. सावंतवाडी तालुक्‍यात तळवडे आणि बांदा येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळाला होता. तर दोडामार्ग तालुक्‍यातील कुडासे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यातील कणकवली शहरात मिळालेल्या दोन रुग्णांमध्ये शिवसेना नेते संदेश पारकर यांचा समावेश आहे. ते आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत.

हेही वाचा- कोरोनानंतर सारीचे आक्रमण : सात दिवसांत या रोगाचे रुग्ण झाले दुप्पट : १३ जणांचा मृत्यू... -

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने १६३ कोरोना तपासणी नमुने प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची संख्या ५ हजार १४० झाली आहे. यातील ५ हजार १२ नमुने प्राप्त झाले आहेत. अजून १२८ नमुने अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील ४ हजार ७०५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३०७ अहवाल बाधित आले आहेत. बाधितापैकी २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक मुंबई येथे उपचारासाठी गेले आहेत. सहा व्यक्तींचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात ५२ रुग्ण सक्रिय राहिले आहेत.
जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात ३७ कोरोना बाधित आणि ३७ कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये ११ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. आज जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील ४ हजार ५०१ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील कोणालाही कोरोनाचे लक्षण आढळले नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- सफाई कामगार ठरले खरे कोरोना योद्धे : चिपळूणात चौघांवर अंत्यसंस्कार -

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ५२० व्यक्ती वाढल्याने येथे १६ हजार ४५४ व्यक्ती दाखल राहिल्या आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमधील ६ व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या ५४ झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ४८५ वाढल्याने येथील संख्या १३ हजार १९३ झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ४१ व्यक्ती वाढल्या असून येथील संख्या ३ हजार १६६  झाली आहे. तर जिल्ह्यात नव्याने १ हजार ६३३ व्यक्ती दाखल झाल्याने २ मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या १ लाख ४७ हजार ८०८ झाली आहे.

 

आमदार नाईक यांच्या संपर्कातील अहवाल प्रलंबित
आमदार नाईक यांच्या संपर्कात आल्याने कोरोना तपासणीसाठी नमुने मोठ्या संख्येने देण्यात आले आहेत. यातील अनेक नमुने गुरुवारी रात्री प्राप्त झाले; मात्र अजून अनेक नमुने अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे चाचणी दिलेल्या व्यक्ती अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

कुडासे येथे कंटेन्मेंट झोन
दोडामार्ग तालुक्‍यातील कुडासे देवमळा येथील सरस्वती विद्यामंदिर येथे ३०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. 
६ ऑगस्टपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे.

संपादन - अर्चना बनगे