शिवसेनेविरूद्ध स्वाभिमान देणार टक्कर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

कणकवली - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाबरोबरच मुंबईतील काही जागा लढविण्याच्या तयारीत आहे. शिवसेना- भाजप युती झाली असली तरी मुंबईत शिवसेनेच्या विरूद्ध उमेदवार उभे करण्याचा निर्णय स्वाभिमान पक्षाकडून झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

कणकवली - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघाबरोबरच मुंबईतील काही जागा लढविण्याच्या तयारीत आहे. शिवसेना- भाजप युती झाली असली तरी मुंबईत शिवसेनेच्या विरूद्ध उमेदवार उभे करण्याचा निर्णय स्वाभिमान पक्षाकडून झाला असल्याची माहिती पुढे आली आहे.

युती झाल्याने भाजप पक्षाच्या जाहीरनामा समितीतून आपणास वगळावे असे पत्र स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पाठविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान आक्रमक भूमिकेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप तसेच इतर सहकाही पक्षामध्ये युती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच झाली आहे; मात्र आता शिवसेनेविरूद्ध लढण्यासाठी मुंबईतील काही मतदार संघात स्वाभिमान आपले उमेदवार देणार आहे.

भाजपचे राज्यसभेचे सदस्य व स्वाभिमानचे संस्थापक श्री. राणे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेविरूद्ध उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना भाजपच्या जागा वाटपात भाजप 25 तर शिवसेना 23 अशा 48 जागांचे वाटप झाले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे स्वाभिमानने येथे लढाईची सुरवातही केली आहे. राणेंनी आक्रमक पावित्रा घेत भाजप पक्षाच्या जाहीरनामा समितीतून आपल्याला वगळण्यात यावे, असे पत्रही भाजपा अध्यक्ष अमीत शहा यांना पाठविले आहे.

शिवसेनेला शह देण्यासाठी स्वाभिमान त्यांच्या उमेदवार असलेल्या ठिकाणी आपला उमेदवार देण्याची तयारी करत आहे. यामुळे येत्या काळात मुंबईतील लढतींसाठी स्वाभिमानचे आणखी काही उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

कोकणी मतांच्या विभाजनाची शक्‍यता
मुंबईत राणेंना मानणाऱ्या मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. शिवसेनेचे मुंबईतील वर्चस्व मूळ कोकणातील मतदारांमुळे आहे. राणेंना मानणाऱ्यांमध्येही कोकणातील चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्वाभिमानने मुंबईत उमेदवार दिल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते.

Web Title: Swabhimaan Rally Against Shivsena