गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच गुन्हेगारी 

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच गुन्हेगारी 

वेंगुर्ले - तालुक्‍यात आठ दिवसांपुर्वी तीन ठिकाणी चोरीचे गुन्हे घडले; मात्र अद्याप या प्रकरणातील आरोपी पकडले गेले नाहीत. पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. राज्याचे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात अशी गुन्हेगारी वाढत आहे; परंतु त्यांच्याकडून दखलही घेतली जात नाही. याबाबत 25 पर्यंत योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आज पक्षाच्या शिष्टमंडळाने लेखी निवेदनाद्वारे पोलिसांना दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की तालुक्‍यात मागील दोन-तीन वर्षांत जबरी चोरी, घरफोडी, जबरी मारहाण या सारखे गंभीर गुन्हे घडले आहेत; परंतू त्यांची सखोल चौकशी योग्य प्रकारे झालेली नसल्याचेच दिसून येत आहे. 6 जुलैला आरवली येथील प्रसिध्द वेतोबा मंदिरातील फंड पेटी फोडली, पाल येथील श्री देवी खाजणादेवी मंदिरातील फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न झाला तर शिरोडा येथे गावडे यांची मोबाईल शॉपी फोडण्यात आली.

हे तिन्ही गुन्हे एकाच वेळी घडले तसेच यांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. तरीही गुन्हेगारांना पकडण्यात येत नाही. पोलिस फक्त चौकशीचा फार्स चालू असल्याचे सांगत आहेत. पोलिसांनी वेंगुर्लेतील तीन्ही चोरी प्रकरणात तत्काळ कारवाई करावी अन्यथा 25 जुलै नंतर शिरोडा पोलिस चेक पोस्ट येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल. तेथे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पक्ष जबाबदार रहाणार नाही. 

तालुकाध्यक्ष दादा कुबल यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, वसंत तांडेल, नितिन चव्हाण, जयंत मोंडकर, मनवेल फर्नांडिस, पपु परब, बिटु गावडे, शिवप्रसाद घारे, मारुती दोडनाशेट्टी, नारायण कुंभार, सायमन आल्मेडा, भूषण आंगचेकर आदींनी हे निवेदन पोलिसांना दिले. 

गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ 
या तालुक्‍यातील आमदार केसरकर हे राज्याच्या गृहमंत्रिपदी आहेत. शिवाय पालकमंत्रीही आहेत. असे असतानाही त्यांच्या खात्याचा कारभार योग्य प्रकारे चालू नाही. वेंगुर्लेतच नव्हे तर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याचा कोणताच प्रयत्न होत नाही. उलट दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. असाच या खात्याचा कारभार सुरू राहिल्यास गन्हेगार मोकाट फिरतील, अशी भीतीही निवेदनातून व्यक्त केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com