सभापती निवडीत स्वाभिमानची बाजी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - काँग्रेसने व्हीप बजावल्याने बहुचर्चित व उत्कंठावर्धक ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली. २८ विरुद्ध २० मतांनी महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार सभापतिपदी निवडून आले. गणेश राणे, मनस्वी घारे हे दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने युतीची सदस्य संख्या कमी झाली.

सिंधुदुर्गनगरी - काँग्रेसने व्हीप बजावल्याने बहुचर्चित व उत्कंठावर्धक ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती निवडीत अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली. २८ विरुद्ध २० मतांनी महाराष्ट्र स्वाभिमानचे उमेदवार सभापतिपदी निवडून आले. गणेश राणे, मनस्वी घारे हे दोन सदस्य अनुपस्थित राहिल्याने युतीची सदस्य संख्या कमी झाली.

बहुमत नसतानाही शिवसेना-भाजप युतीने चारही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरल्याने या निवडींकडे लक्ष लागले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी काम पाहिले. निवड जाहीर होताच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने 
जल्लोष केला.

महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे जेरॉन फर्नांडिस, मनीषा दळवी, पल्लवी राऊळ, अंकुश जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. युतीकडून वित्त व बांधकाम सभापतिपदासाठी प्रदीप नारकर, शिक्षण व आरोग्य राजेश कविटकर, महिला व बालकल्याणसाठी वर्षा कुडाळकर, समाजकल्याणसाठी मानसी जाधव यांनी अर्ज केले होते. दुपारी ३ वाजता पीठासन अधिकारी विजय जोशी 
यांच्या उपस्थितीत या निवडीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खास विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरिश जगताप, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.

व्हीप बजावण्याचे अधिकार काँग्रेसला नाहीत
जिल्हा परिषदेत आम्ही निवडून आलो ते नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे. आमचा स्वतंत्र गट असून, मी त्या गटाचा गटनेता आहे. त्यामुळे काँग्रेसला व्हीप बजावण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने व्हीप बजावणे चुकीचे आहे, या व्हीपचा आमच्या कोणत्याही सदस्यावर परिणाम होणार नाही. आजच्या निवडणुकीत गैरहजर राहून सहकार्य करणाऱ्या भाजपच्या दोन्ही सदस्यांना मी धन्यवाद देतो, असे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

असे आहेत नवीन सभापती
जिल्हा परिषद समिती सभापती पदाची निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. स्वाभिमानतर्फे साटेली-भेडशी मतदारसंघातून निवडून आलेल्या व नुकत्याच राष्ट्रवादीतून स्वाभिमान पक्षात प्रवेश केलेल्या मनीषा दळवी यांना आरोग्य व शिक्षण सभापतीची लॉटरी लागली. आचरा मतदारसंघाचे सदस्य जेरॉन फर्नांडिस यांना वित्त व बांधकाम सभापती, मांडखोल मतदारसंघाचे सदस्य पल्लवी राऊळ यांना महिला व बालकल्याण सभापती तर ओरोस मतदारसंघाचे सदस्य असलेले; परंतु दोडामार्ग तालुक्‍याचे रहिवासी अंकुश जाधव यांची समाजकल्याण सभापती निवड झाली आहे.
 

Web Title: Swabhiman Wins in Choosing the Speaker