जिद्दीचे दुसरे नाव बनले स्वप्नील सावंत-देसाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

चिपळूण - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेचा स्वप्नील सावंत-देसाई १०३ व्या रॅंकने उत्तीर्ण झाला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले.

चिपळूण - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सह्याद्री शिक्षण संस्थेचा स्वप्नील सावंत-देसाई १०३ व्या रॅंकने उत्तीर्ण झाला.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने शिक्षण पूर्ण केले. उच्चस्तरीय अधिकारी होण्यासाठी त्याने आठ वर्षे सतत प्रयत्न चालविले होते. परिस्थितीशी झुंज देत तो उपनिरीक्षक झाला. महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमी नाशिक येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे.

रत्नागिरीतील जाकादेवी हे स्वप्नीलचे मूळ गाव. वडील नरेंद्र सावंत-देसाई खासगी कंपनीत कामाला होते. स्वप्नील अधिकारी व्हावा ही त्यांची इच्छा होती. सावर्डे येथे मामाकडे राहून त्याने शरदचंद्रजी पवार फूड टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. २०११ मध्ये पदवीधर होऊन स्वप्नीलने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

आठ वर्षांत पोलिस उपनिरीक्षक पदाच्या चार, कर निरीक्षकच्या चार, सहायक कक्ष अधिकारीच्या दोन, राज्य सेवा आयोगाच्या दोन, आरएफओ आणि सहायक आयुक्तच्या प्रत्येकी एक मुख्य परीक्षा दिल्या. प्रत्येक परीक्षेत त्याची संधी थोडक्‍यात हुकली. मात्र, त्याने जिद्द सोडली नाही. २०१७ च्या परीक्षेत त्याने यशाला गवसणी घातली. १२ हजार विद्यार्थ्यांमधून १०३च्या रॅंकने तो उत्तीर्ण झाला. सह्याद्री शिक्षण संस्थेने अनेक विद्यार्थी घडविले आहेत. त्यामध्ये स्वप्नील सावंत-देसाईची भर पडली.

याबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेकडून स्वप्नीलचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक अन्वर मोडक, पर्यवेक्षक नंदकिशोर मालेकर, विजय चव्हाण, सलीम मोडक, उद्धव तोडकर, महेश महाडिक आदी उपस्थित होते.

आव्हानात्मक काम करायला आवडेल
जिद्द, चिकाटी व आत्मविश्‍वासाच्या बळावरच मी पोलिस उपनिरीक्षक होऊ शकलो. आई, वडील आणि शेखर निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्यात कुठेही सेवा करण्याची माझी तयारी आहे. आव्हानात्मक जबाबदारी मिळेल तर काम करायला आवडेल. जी जबाबदारी मिळाली आहे, त्या ठिकाणी तन्मयतेने काम करण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया स्वप्नीलने ‘सकाळ’ला दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swapnil Sawant Desai success in MPSC PSI exam