esakal | गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्गातील यंत्रणा अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

-

चाकरमान्यांत कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांची रॅपीड टेस्ट करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्गातील यंत्रणा अलर्ट

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची यंत्रणा अधिक अलर्ट केली आहे. एक ऑगस्टपासून जिल्ह्यातील चेक नाक्‍यावर महसूल, पोलिस आणि आरोग्य यांचे संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे. येणाऱ्या चाकरमान्यांत कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांची रॅपीड टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांची संभाव्य वाढ लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात 215 बेडची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास अजून तालुका पातळीवरही व्यवस्था उभी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी गुरूवारी येथे दिली. 

त्या म्हणाल्या, "गणेशोत्सवसाठी राज्य शासनाने सुधारित मार्गदर्शन दिलेले नाही. त्यामुळे नवीन मार्गदर्शन येईपर्यंत जुन्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियम राहणार आहेत. 14 दिवस क्‍वारंटाईन बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या उलट सुलट चर्चा सुरु आहे; परंतु चाकरमान्यांनी गैरसमज करून घेवू नये. कारण आयसीएमआरच्या नियमांचे पालन आम्हाला करावे लागत आहे. याबाबत आपण सरपंच व नागरिक यांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहोत.'' 

गणेशोत्सव जवळ येत आहे. गणेशोत्सवात सुमारे दीड लाख चाकरमानी येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे याबाबत वेगळे नियोजन केले असून सर्व यंत्रणा अलर्ट केली आहे, असे सांगत मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ""जिल्ह्याच्या सर्व चेक पोस्टवर महसूल, पोलिस आणि आरोग्य या तिन्ही विभागाचे संयुक्त पथक एक ऑगस्टपासून कार्यरत राहणार आहे. ज्या चेकपोस्टवरुन जिल्ह्याबाहेरील नागरिक जिल्ह्यात दाखल होणार आहेत त्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीची कोरोनाची रॅपीड टेस्ट करण्यात येणार आहे. सर्वांची ही तपासणी करण्यात येणार नाही. चेकनाक्‍यावर कडक तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. 

म्हणून कोविड सेंटरला भेट 
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड-19 कक्षाला भेट दिली होती. याबाबत मंजूलक्ष्मी यांनी सांगितले, की कोविड-19 कक्षाबाबत तक्रारी आल्या होत्या. जेवण व्यवस्थित मिळत नसल्याबाबतही तक्रार होती. त्यामुळे आपण अचानक भेट देत चौकशी केली. त्यावेळी जेवण चांगले मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले. 

गणेशोत्सवनंतर शाळांचा निर्णय 
जिल्ह्यात सध्या रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्याबाहेरील व्यक्तीही येत आहेत. त्यामुळे संस्थात्मक क्‍वारंटाईनसाठी घेतलेल्या शाळांची संख्या वाढत आहे. परिणामी जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय गणेशोत्सवानंतर घेऊ, असे मंजूलक्ष्मी यांनी सांगितले. 


संपादन ः विजय वेदपाठक

loading image
go to top