हलगर्जीपणाबद्दल कारवाई करू - दीपक केसरकर

बांदा - येथे रुग्णांची विचारपूस करताना पालकमंत्री दीपक केसरकर.
बांदा - येथे रुग्णांची विचारपूस करताना पालकमंत्री दीपक केसरकर.

बांदा - माकडतापाने मृत झालेल्यांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत उपलब्ध करून देणार आहे. तसेच ज्या विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही साथ नियंत्रणात आली नाही, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावत सांगितले. बांद्यात दोन जणांचा पाठोपाठ माकडतापाने मृत्यू झाल्याने संपूर्ण यंत्रणा जागी झाली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी बांदा आरोग्य केंद्राला सोमवार (ता. ६) रात्री भेट दिली. त्यांनी उद्यापासून सर्व यंत्रणा राबवित माकडताप कसा नियंत्रणात आणता येणार यासंबधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासाठी लागेल तेवढा निधी प्रशासनामार्फत देण्यात येईल. तसेच सिंधुदुर्गमधून या साथीला हद्दपार करून हा जिल्हा माकडताप मुक्त करूया, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, जिल्हा आरोग्य 

अधिकारी योगेश साळे, सावंतवाडीचे तहसीलदार सतीश कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण, जिल्हा परिषद सदस्य श्‍वेता कोरगांवकर, बांदा सरपंच बाळा आकेरकर, उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक, विजय कदम, वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील, बांदा सहायक निरीक्षक प्रदीप गीते, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना पांगम, माजी सभापती विनायक दळवी आदींसह अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री केसरकर यांनी प्रथम आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. कोणतीही मदत जिल्हा प्रशासन किंवा गोवा मेडिकल कॉलेजकडून लागल्यास तातडीने संपर्क करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. तसेच बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांच्या मदतीसाठी आणखी डॉक्‍टर उद्यापासून उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांना दिले.

केसरकर म्हणाले, ‘‘माकडतापाची साथ ही जंगलातून येत असल्याने या ठिकाणी मृत माकड व त्यांची विल्हेवाट लावण्याची सर्वस्वी जबाबदारी वनविभागाची आहे. कोणतीही टाळाटाळ केल्यास कारवाई करू. तसेच उद्यापासून जिल्ह्यातील इतरत्र भागातून कर्मचारी मागवून त्या ठिकाणी सटमटवाडी परिसरात व त्यांच्या आजूबाजूच्या पाच गावात डंस्टिग करा. त्यासाठी आवश्‍यक साठा उपलब्ध आहे. या पुढे एक ही मृत माकड ग्रामस्थांनी सांगितलेल्या वेळेनंतर तातडीने कार्यवाही करून त्या ठिकाणी परिसर निर्जंतुक करा. त्याचबरोवर वन विभाग व पशुसंर्वधन विभागामार्फत पन्नास जणांची टीमने संयुक्तपणे काम करीत तातडीने सर्व जंगल परिसरात डंस्टिग करण्यासाठी सुरू करा.’’

या वेळी उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक व पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांना या साथीबाबत ज्या कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ झाली आहे. त्यांचे रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे तत्काळ करा. त्यांच्यावर कारवाई करू, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी बांदा-सटमटवाडी ग्रामस्थांनी गेले अडीच महिने झालेल्या त्रासांची कैफियत पालकमंत्री केसरकर यांच्याकडे मांडली. आरोग्य विभागाकडून व्यवस्थित काम होत असून, फक्त रक्त तपासणी वगळता सर्व उपचार या ठिकाणी मिळत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. ही साथ वनविभाग व पशु विभागाच्या हलगर्जीपणामुळेच दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप या वेळी ग्रामस्थांनी केला. यावर पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘ज्याच्या हलगर्जीपणामुळे ही स्थिती उद्‌भवली आहे. त्या सर्वांवर आपण कारवाई करणार आहे; मात्र तूर्तास ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी आपणाला प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने संबंधित सर्वच विभाग कामाला लागणार आहे. आणि तसे न झाल्यास मी परत शनिवारी येणार आहे. त्या वेळी तुम्ही मला सांगा, मग आपण पुढील पाऊल उचलू. या रोगात ज्यांचा मुत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत उपलब्ध करून देणार आहे आणि त्या संबंधीचे प्रस्ताव तयार केले आहे.’’ 

पालकमंत्री केसरकर यांनी या वेळी आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. तसेच या साथ रोगाला घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी ग्रामस्थ आनंद वसकर, सचिन वीर, सुशांत पांगम, जावेद खातीव, दीपक सावंत, मधुकर देसाई, गुरू सावंत, भाऊ वाळके, संदेश पावसकर, बाळा वाळके, भैया गोवेकर, दिलीप परब, सुनील नाटेकर, गजानन गायतोंडे आदींनी चर्चेत भाग घेतला.

कारवाई करणार...
केसरकर म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत दोन खात्यांकडून या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचे दिसत आहे. वन व पशुविभागातील हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करणार आहे, त्या संबंधीचे अहवाल दोन्ही खात्यांकडून मागविले आहेत.’’

शाब्दिक चकमक...
पालकमंत्री केसरकर यांची बैठक आटोपल्यानंतर येथील ग्रामस्थांनी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी वाय. ए. पठाण यांना घेराओ घातला. या वेळी बांदा सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. या वेळी तुम्ही आड का येता आम्हाला पशुविभागाच्या अधिकाऱ्यांक्षी बोलू द्या, असे सांगितल्याने थोडा वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
 

शिमोगाच्या पार्श्‍वभूमीवर आदेश...
या वेळी पालकमंत्री केसरकर यांनी माकडताप साथ नियंत्रणात आणण्यासाठी शिमोगाच्या पार्श्‍वभूमीवर काम करण्याचे आदेश वनविभाग व पशुविभागाला दिले. यासाठी पन्नासजणांची टीम कार्यरत करण्यास सांगितले. तसेच त्या ठिकाणच्या तज्ज्ञांना या ठिकाणी बोलवा किंवा तुमच्या वरिष्ठांशी तत्काळ बोलून यावर उपाययोजना करण्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com