सावंतवाडीत विकास परिषद घेणार - साळगावकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सावंतवाडी - जिल्ह्यात औद्योगिक क्रांती निर्माण होण्यासाठी सर्वपक्षियांच्या उपस्थितीत सावंतवाडीत विकास परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यांना बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.

सावंतवाडी - जिल्ह्यात औद्योगिक क्रांती निर्माण होण्यासाठी सर्वपक्षियांच्या उपस्थितीत सावंतवाडीत विकास परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यांना बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.

माजी आमदार शिवराम दळवी यांनी येथील पालिकेला भेट दिली. यावेळी श्री. साळगावकर यांनी जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, आवश्‍यक रोजगार प्रकल्प या ठिकाणी यावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून वस्तूस्थिती मांडा, अशी मागणी यावेळी केली.

त्यानंतर श्री. साळगावकर उपस्थित पत्रकारांशी बोलत होते. उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, अनारोजीन लोबो, रेमिन अल्मेडा, बाळू परब आदी उपस्थित होते.

श्री. साळगावकर म्हणाले, ""जिल्ह्यात रोजगार निर्माण करून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात राजकीय लोकांकडुुन प्रयत्न झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारचे प्रकल्प याठिकाणी यावेत यासाठी आपण पुढाकार घेणार आहे. त्यासाठी आता आपण सर्व राजकीय नेत्याची मदत घेवून सावंतवाडी विकास परिषदेचे आयोजन करणार आहे.

यात पालकमंत्री केसरकर, माजी मुख्यमंत्री राणे खासदार राऊत, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे प्रमोद जठार यांना बोलावून चर्चा करणार आहे. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी काय करता येवू शकते, कोणते प्रकल्प याठिकाणी आणता येवू शकतात याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.''

ते पुढे म्हणाले, याठिकाणी माझ्या भूमिकेचे समर्थन करून आमदार राणे यांनी आनंदवाडी येथे पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प आणला. पालकमंत्री केसरकर यांनी बांद्यात आयटीपार्क आणि चश्‍मा कारखाना आणला. राजन तेली यांनी सी वर्ल्ड प्रकल्प व्हायलाच पाहीजे, अशी भूमिका मांडली. या सर्वाचा आभारी आहे.''

शरद पवार सावंतवाडीत येणार
माजी आमदार जयानंद मठकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सावंतवाडी व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना बोलविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी दीपक केसरकर तर तिसऱ्या दिवशी नारायण राणे यांना आमंत्रण देण्यात येणार आहे, असेही साळगावकर म्हणाले.

Web Title: take up development council in Sawantwadi