महिला शक्तीला मिळाले बळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नेतृत्व करण्यास जिल्ह्यातील तनिष्का प्रतिनिधी सिद्ध

नेतृत्व करण्यास जिल्ह्यातील तनिष्का प्रतिनिधी सिद्ध

रत्नागिरी/ सावर्डे : रत्नागिरी जिल्ह्यातील तनिष्का प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत उत्साहात पार पडली. महिलांनी अत्यंत हिरीरिने या निवडणुकीत भाग घेतला. उमेदवारांनी प्रचारात कोणतीही कसर सोडली नाही; मात्र त्याचबरोबर प्रचाराची पातळी अत्यंत उच्च आणि निर्विश होती. नेतृत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते मिळवणाऱ्या प्रतिनिधींनी आपले नेतृत्व गुण सिद्ध करण्यास कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले. त्याचबरोबर दुसऱ्या पसंतीची मते मिळवणाऱ्यांनीही लोकसहभाग आणि महिलांचा पाठिंबा मिळवण्यात पर्यायाने नेतृत्व करण्यात आपणही कमी नाही याचा दाखला दिला.

या निवडणुकीची महिलांना अपूर्वाईच होती. रत्नागिरीमध्ये कल्पना लांजेकर, लांज्यामध्ये शमा थोडगे, चिपळूणमध्ये पूजा निकम, गुहागरमध्ये मनाली बावधनकर, खेडमध्ये सायली कदम या पहिल्या पसंतीच्या प्रतिनिधी ठरल्या. पाच तालुक्‍यांतील एकूण 11 उमेदवार होते. मतदान केंद्रासह फिरत्या मतदान केंद्राआधारेही मतदान करण्यात आले. तरुणींनी अत्यंत उत्साहाने मतदान केले. सामाजिक स्तरावर काम करताना सर्वांना एकत्रित घेऊन काम करू आणि महिलांच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊ, असे या महिलांनी सांगितले. चिपळूणमधील मतदान अत्यंत चांगले आणि खेड्यापाड्यातूनही झाले. मिस्डकॉलचा प्रयोग प्रथमच करण्यात आला. त्या मतदानाआधारे काही ठिकाणी निकालात फरक पडला.

तनिष्का चिपळूण प्रतिनिधी म्हणून पहिली पसंती मिळवणाऱ्या पूजा शेखर निकम यांनी दणदणीत मते मिळविली. जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्‍य त्यांनी घेतले. चिपळूण तालुक्‍यात तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून पूजा निकम यांनी केलेला प्रचार, घेतलेले मेळावे तसेच सोशल मीडियाच्या वापरामुळे मतदानात त्यांनी आघाडी घेतली. त्यांना प्रथम पसंतीची मते मिळाल्याचे कळल्यावर सावर्डेत त्यांच्या पाठीराख्यांनी सावर्डे परिसरात फटाक्‍यांची आतषबाजी केली. समर्थक महिलांनी "पूजा निकम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Web Title: tanishka elections in konkan

टॅग्स