कोरोनावर मात करण्यासाठी तनिष्का सरसावल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

तालुक्‍यातील वजराठ येथील माजी सभापती तथा सकाळच्या तनिष्का सदस्य सुचिता वजराठकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्री दुर्गामाता स्वयंसहाय्यता महिला संघाच्यावतीने मास्कची निर्मिती करण्यात येत आहे.

वेंगुर्ले ( सिंधुदर्ग ) - कोरोना विषाणूच संकट दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी सिंधुदुर्गातील वजराठमधील तनिष्का सरसावल्या आहेत. आपल्या कौशल्यातून सामाजिक बांधिलकी जपत शासनाने या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या वैयक्तिक स्वच्छता, संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करत तालुक्‍यातील वजराठ येथील माजी सभापती तथा सकाळच्या तनिष्का सदस्य सुचिता वजराठकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्री दुर्गामाता स्वयंसहाय्यता महिला संघाच्यावतीने मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. या गटाच्या सदस्य अत्यल्प दरात नफा कमावण्याचा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता मास्क उपलब्ध करून देत आहेत. 

कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. हा विषाणू भारतातही दाखल झाला असून शासनाच्यावतीने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व पातळीवरून खबरदारीच्या आवश्‍यकत्या उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने शक्‍य आहे त्या स्वरूपात सहभाग देत आहेत. या आपत्तीच्या परिस्थितीत सॅनिटायझर व मास्क याचा समावेश अत्यावश्‍यक वस्तूंमध्ये केला आहे.

या परिस्थितीत समाजाप्रती कर्तव्याचे भान ठेवून येथील वजराठकर यांच्या संकल्पनेतून या गटाने मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. बनवलेले मास्क अत्यल्प दरात मागणीनुसार ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांना देत आहेत. या गटात पाच ते सहा महिलांना शिवणकाम येत असून याचा वापर त्यांनी मास्क बनवण्यासाठी केला आहे. आतापर्यंत या गटाने 1 हजार मास्कची विक्री केली आहे. 

यांचा आहे सहभाग 

या गटाच्या सदस्यांचा या उपक्रमात सक्रीय सहभाग आहे. यात अध्यक्ष - निकिता सावंत, उपाध्यक्ष - रसिका मेस्त्री, सचिव तथा तनिष्का सदस्य सुचिता वजराठकर, सदस्य - रविना पालयेकर, कीर्ती मेस्त्री, श्रेया गावडे, शीतल सावंत, संगीता आडारकर, प्रियांका मेस्त्री, सावित्री वजराठकर, प्रतिभा सकपाळ, लीलावती परब यांचा समावेश आहे. 

""गटात 12 सदस्य असून 2004 ला गट रजिस्टर झाला. त्यानंतर या गटाने विविध उपक्रमात हिरहिरिने सहभाग घेतला. शालेय पोषण आहार, शालेय गणवेश बनवून देणे आदी कामे या गटांमार्फत आम्ही करतो. कोरोनावर मात करण्यासाठी समाजासाठी काही तरी करावे, या उद्देशाने आम्ही मास्क तयार करण्यास सुरुवात केली. सुरवातीला वजराठ ग्रामपंचायतकडून आम्हाला कापड पुरवण्यात आले. यातून आम्ही ग्रामपंचायतला मोफत मास्क शिवून दिले. यानंतर अत्यल्प दरात तुळस ग्रामपंचायतला 200 तर लोकप्रतिनिधींना 500 ते 600 मास्क शिवून दिले.'' 
- सुचिता वजराठकर, तनिष्का सदस्य तथा माजी सभापती वेंगुर्ले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taniska Make Mask To Avoid Corona Sindhudurg Marathi News