रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तापसरीने फुल्ल

सकाळ वृत्तसेवा | Wednesday, 31 July 2019

रत्नागिरी - वातावरणातील सततच्या बदलाचा लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात ताप-सर्दी, संर्पदंश आदी रुग्णांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालय फुल्ल झाले आहे. रुग्णालयाची क्षमता 220 खाटांची असताना 300 रुग्ण दाखल झाले आहेत. खाटांची कमतरता असल्याने प्रत्येक वार्डमध्ये जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांना जागा करून दिली आहे. 

रत्नागिरी - वातावरणातील सततच्या बदलाचा लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात ताप-सर्दी, संर्पदंश आदी रुग्णांमुळे जिल्हा शासकीय रुग्णालय फुल्ल झाले आहे. रुग्णालयाची क्षमता 220 खाटांची असताना 300 रुग्ण दाखल झाले आहेत. खाटांची कमतरता असल्याने प्रत्येक वार्डमध्ये जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांना जागा करून दिली आहे. 

या परिस्थितीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या 100 खाटांच्या नवीन इमारतीचे लवकरात लवकर उद्‌घाटन व्हावी, अशी जनतेची मागणी आहे. पावसाळी वातावरणामुळे वातावरणात झटपट बदल होत आहे. ग्रामीण भागातील जवळजवळ सर्वच गावातून तापाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. ताप, डायरिया, सर्पदंश आदी आजार, दूषित पाण्यामुळे होणारे आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा रुग्णालय हाऊस फुल्ल झाले आहे.

शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांचा यात समावेश आहे. रुग्णालयाची 220 रुग्णांची क्षमता आहे. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची संख्या 300 पर्यत जात असल्यामुळे वॉर्डमध्ये जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांची व्यवस्था केली जात आहे. त्यात कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तत्काळ उपचार मिळावे, यासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विटेकर, डॉ. पाटोदे, डॉ. सांगवीकर, डॉ. सूर्यगंध, डॉ. कुंभारे प्रयत्न करत आहेत. सुस्थितीत रुग्णांना डिस्चार्ज देणे, पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. 

मंगळवारी 545 रुग्णांची नोंद 
गेल्या पाच दिवसात जिल्हा रुग्णालयात 1 हजार 634 रुग्णांची नोंद झाली. आज ओपीडीत 545 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 268 रुग्णांना दाखल करून घेण्यात आले. वातावरणामुळे व्हायरल फिव्हर, डायरिया आणि संसर्गजन्य रोग, हाता-पायांना सूज, अशा आजाराचे हे रुग्ण आहेत. 

"वातावरणातील बदलामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. उपचार मिळावे यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. नवीन शंभर कॉटची इमारत आहे. मात्र त्या ठिकाणी रुग्णांसाठी लागणाऱ्या सुविधांची वानवा आहे. स्टाफ कमी आहे.'' 
- डॉ. सुभाष चव्हाण,
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक