आदिवासी विदयार्थ्यांना त्यांच्या बोली भाषेतून शिक्षण द्या- अॅड. राकेश पाटील

अमित गवळे
बुधवार, 23 मे 2018

पाली - आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बोली भाषेत शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे त्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण होवून आदिवासी वाड्यांवरील मुले शिक्षणाकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन अॅड. राकेश पाटील यांनी केले. एच.ओ.एस. बालग्राम या संस्थेच्या आयोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पाली - आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या बोली भाषेत शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे त्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण होवून आदिवासी वाड्यांवरील मुले शिक्षणाकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन अॅड. राकेश पाटील यांनी केले. एच.ओ.एस. बालग्राम या संस्थेच्या आयोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

एचओएस ही संस्था अनाथ मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी गेली ५० वर्षे कार्य करीत आहे. या संस्थेच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या संदर्भातील बालहक्क आणि बालकांचे अधिकार या विषयावर प्रबोधन करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अॅड. राकेश पाटील यांचे व्याख्यान अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथील आदिवासीवाडीवरील समाजमंदिरात आयोजित केले होते. याठिकाणी पोयनाड व पेझारी या गावच्या अजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या आदिवासी विदयार्थ्यांनी देखिल सहभाग घेतला होता.

अॅड. राकेश पाटील यांनी उपस्थित आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करुन देवून विद्यार्थ्यांची ओळख त्यांनी आदिवासी बोलीभाषेत करुन घेतली. त्यांनी नागरीकशास्त्राप्रमाणेच देशाचे संविधान आणि आदिवासी समाजाला संविधानाने दिलेले अधिकार या विषयावर चर्चा केली. उपस्थित विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या तसेच अलिबागचे कुळ कायदा जनक नारायण नागू पाटील आदी महापुरुषांच्या त्यागाची आणि सामाजिक कार्याची माहिती सांगितली.

यावेळी एसओएस संस्थेचे पदाधिकारी रिमा सावंत, राजेंद्र मोहनती, संजय कचरेकर, प्रणामी गर्ग हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी पेझारी-पोयनाड विभागातील पोयनाड वाडी, वाघोडेवाडी आणि चंदरवाडी आदिवासी मुले उपस्थित होती

शालतली भाषा आम्हाला कलत नाय !
आदिवासी समाज इतर समाजांपासून वेगळा का राहता? आदिवासी समाजामध्येच बालविवाह का केले जातात? हिंस्त्र प्राण्यांशी झुंझ देणारा हा लढवय्या समाज इतर समाजापासून दूर राहण्याची कारणे तरी काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली की, ''सर आमचा आय-बाबा शालन गेला नाय. त्यांनी पुस्तकांनी काय लिवलंय तेच माहित नाय, त्यामुळं तो अरानी राह्यला, शिकला असता तर मोठा सायेब झाला असता''. अशा अनेक प्रश्नांवर पाटील यांनी चर्चा केली. उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींबाबत अॅड.राकेश पाटील यांनी विचारले असता अनेक विद्यार्थी म्हणाले की, ''शालेत शिकवली जाणारी भाषा ही आम्हाला काही प्रमाणांत कळत नाय. आमाला आमचे भाषेन जर सांगितलं तर ते लवकर आमाला कळून आमचा अभ्यास सोपा होईल''.

पाण्यामुळे अभ्यास व्हत नाय !
''वाडीवर पोटभर पाणीच नसल्यामुळे सकाळचा अभ्यास करण्याचा टाईम आमचा पाणी भरण्यातच जातो. अभ्यास कराची मनात हाउस असली तरी पानी आणि कपडे धुण्यातच आमचा वेळ जातो. शालेत मिलणाऱ्या टायमातच आमी अभ्यास करतो. आमाला पण शिक्षण घेवून मोटं साहेब होवाचं हायं''.

अंगटा कशाला देवाचा....
राकेश पाटील हे गुरु-शिष्याच्या त्यागाचे महत्व सांगत असतांना एकलव्य आणि द्रौणाचार्य यांच्या गुरु-शिष्याचं नातं सांगत होते. तेवढ्यात एक आदिवासी विद्यार्थी म्हणाला की,''सर एक लव्याने केलेली चूक आम्ही नायं करणार बा....त्यांनी अंगटा कशाला देवाचा.... बदल्यान पैसं देवाचं....'' हे अचंबित करणारे तार्किक उत्तर एैकल्यावर अॅड. पाटील यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि नाण्याच्या दोन्ही बाजूंचा अभ्यास करावा म्हणत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोरबच क्रीडा, वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये आपल्या गुणांना चालना द्यावी. असे सांगितले.

Web Title: Teach tribal students from their language of speech - Adv. Rakesh Patil