मुलांना आवडत्या गोष्टींवर एकाग्र व्हायला शिकवा - डॉ. पुष्पा द्रविड

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात प्रकट मुलाखतीत बोलताना डॉ. पुष्पा द्रविड. शेजारी शर्मिला पटवर्धन.
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात प्रकट मुलाखतीत बोलताना डॉ. पुष्पा द्रविड. शेजारी शर्मिला पटवर्धन.

रत्नागिरी - ‘‘मुलांना घरातून नकळत संस्कार मिळत असतात, ते वेगळे द्यावे लागत नाहीत, घरातील चांगले, वाईट वातावरण मुलांवर नकळत परिणाम करत असते, त्यांना घडवत असते. मुलांना कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टीवर एकाग्र व्हायला शिकवा, ते आपोआप घडत जातील’’, असे प्रतिपादन जगप्रसिद्ध क्रिकेटपटू राहुल द्रविड यांची आई डॉ. पुष्पा द्रविड यांनी केले. 

रत्नागिरी नगर वाचनालयामध्ये ‘रंगषटकार’ या त्यांच्या प्रकट मुलाखतीतून त्यांचे अंतरंग जाणून घेतानाच राहुल कसा घडला असेल, कठीण परिस्थितीतही तो एखाद्या भिंतीप्रमाणे खंबीर राहू शकला हे सहजपणे उलगडत गेले. वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी डॉ. द्रविड, सौ. फाटक आणि डॉ. द्रविड यांच्या शिष्या संगीता राशीनकर यांचा सत्कार केला. चित्र-शिल्पकार डॉ. द्रविड यांची कला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली आहे; परंतु त्यांच्यातील कलाकाराने नेहमीच घर, पती, विजय आणि राहुल ही दोन मुले आणि नोकरी याला प्राधान्य दिले. घर सावरतानाच त्यांनी एक क्रिकेटपटू घडविला. काम पडतंय, नोकरी असल्याने वेळ नाही, अभ्यासच महत्त्वाचा आहे असे कोणतेही कारण न पुढे करताना त्यांनी विजय आणि राहुल यांच्यामधील खेळांची आणि विशेषत: राहुलमधील क्रिकेटची आवड जपली. मुलांच्या आवडीलाही प्रोत्साहन दिल्याने त्यांच्या मुलांनी त्यांना अभ्यासामध्येही निराश केले नाही.

त्यामुळेच त्यांची दोन्ही मुले उच्च स्थानावर पोचली. त्यांची जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या आवडीला प्राधान्य दिले आणि वयाच्या साठाव्या वर्षानंतर अनेक कलाकृती तयार केल्या. चिन्नास्वामी स्टेडियमवरील तसेच विविध ठिकाणी त्यांनी उभारलेली त्यांची म्युरल्स, चित्रकला प्रदर्शने यातूनच त्यांच्यातील कलाकार दिसून येतो. या वेळी त्यांनी अनेक आठवणी उपस्थितांना सांगितल्या.

राहुल द्रविडच्या करिअरमधील चढ-उताराच्या वेळी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची त्यांची भूमिका, आनंदही अत्यंत सहजपणे साजरा करण्याची द्रविड कुटुंबाची पद्धत, साधेपणा आणि सहजपणा हीच जीवनाची वैशिष्ट्ये घेऊन जगणारे हे कुटुंब कौटुंबिक मूल्यांना आजही जपते हे डॉ. द्रविड यांच्या मुलाखतीमध्ये प्रकट झाले. मुलाखत रत्नागिरीच्या माहेरवाशीण  शर्मिला पटवर्धन- फाटक यांनी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com