esakal | शिक्षकदिन विशेषः रत्नागिरी जिल्ह्यात 2,676 शाळांमध्ये ऑनलाइन धडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Day Special Online Lessons In 2676 Schools In Ratnagiri District

रत्नागिरी जिल्ह्यात 2,930 शाळा आहेत. त्यातील 2,676 शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असून 255 शाळांमधील विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शिकवले जात आहे. कोरोनाच्या संकटातही शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले जात आहे. 

शिक्षकदिन विशेषः रत्नागिरी जिल्ह्यात 2,676 शाळांमध्ये ऑनलाइन धडे 

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी - कोरोनाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झाला आहे; मात्र विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शहरी भागातीलच नव्हे तर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यास सुरवात केली आहे. भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या गावात मोबाईलला रेंज नसली तरीही शिक्षणात खंड पडलेला नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात 2,930 शाळा आहेत. त्यातील 2,676 शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असून 255 शाळांमधील विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शिकवले जात आहे. कोरोनाच्या संकटातही शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले जात आहे. 

जिल्ह्यात सुमारे 75 हजार विद्यार्थी असून सहा हजार शिक्षक आहेत. बहुतांश शिक्षकांनी कोरोना कालावधीतही शिक्षणाचे कामकाज न थांबवता विविध पर्यायांचा उपयोग करून विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा फंडा अवलंबला आहे. त्यात ऑनलाइन अभ्यासक्रमाची कास धरली. सह्याद्रीचा टीलीमीली कार्यक्रम शिकवणीचा मार्ग आहे.

दीक्षा ऍपवरील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना मोबाईलवर व्हॉटस्‌ऍपद्वारे पाठवले जातात. ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत पण साधे मोबाईल आहेत त्यांच्याशी शिक्षक संवाद साधतात. सराव प्रश्‍नपत्रिका तयार करून त्या व्हॉटस्‌ ऍपवरून सोडवून घेण्यात येतात. त्याचे मूल्यमापन करून त्रुटी सोडवल्या जात आहेत. 

ऑनलाइन शिक्षण सुरू असलेल्या 2,676 शाळांपैकी 2,354 शाळा जिल्हा परिषदेच्या तर 322 खासगी शाळा आहेत. ऑनलाइन सुविधा नसलेल्या 207 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. रत्नागिरी तालुक्‍यात 317 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 825 शिक्षक कार्यरत आहेत.

कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आणि शिक्षणात खंड पडला. तालुक्‍यात सुमारे 18 हजार विद्यार्थी आहेत. ऑनलाइनचा वापर न करणारे 50 टक्‍के तर साधे मोबाईल असलेले 20 टक्‍के विद्यार्थी आहेत. 30 टक्‍के विद्यार्थ्यांचे शिक्षण गृहभेटीतूनच सुरू आहे. रत्नागिरी तालुक्‍यात रेंज नसलेले कळझोंडी, आगरनरळ, गडनरळ, डोर्ले, कुर्धे, गणेशगुळे गावातील काही भाग आहेत. जिथे मोबाईलला रेंजच नाही तिथे गृहभेटीचा पर्याय शिक्षकांनी अवलंबला आहे.

कोरोनातील परिस्थितीमधून मार्ग काढत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी शिक्षकांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. अडचणी आल्या तरीही त्यातून मार्ग काढला जात आहे. 
- सुनील पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, शिरगाव. 

 
 

loading image