मोतेंच्या बंडखोरीने चुरस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

शिक्षक परिषद निवडणूक - विभाजन टाळण्यासाठी भाजपची धावपळ

कणकवली - कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा आजवरचा बालेकिल्ला होता. यात विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. साहजिकच शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांच्यापुढे शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचे आव्हान आहे.

शिक्षक परिषद निवडणूक - विभाजन टाळण्यासाठी भाजपची धावपळ

कणकवली - कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा आजवरचा बालेकिल्ला होता. यात विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. साहजिकच शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांच्यापुढे शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांचे आव्हान आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे २४५६ मतदार आहेत; परंतु यातील एकही मत रामनाथ मोते किंवा अन्य उमेदवारांच्या पारड्यात जाऊ नये यासाठी जिल्ह्यात शिक्षक संघटनांच्या बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. कणकवलीत माजी आमदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या निवासस्थानी तर सलग दोन दिवस राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि विविध शिक्षक संघटनांच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक सुरू होती.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १५ हजार ६३६ मतदार आहेत. त्यानंतर पालघरमध्ये ५ हजार ११५, रायगडमध्ये १० हजार, रत्नागिरीत ४ हजार ३२८ असे मतदार आहेत. यात सिंधुदुर्गची जबाबदारी अतुल काळसेकर, रत्नागिरीची बाळ माने, तसेच रायगडची जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, तर कोकण विभागाचे नियंत्रण करण्याचे काम राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शिक्षक परिषदेच्या उमेदवाराला यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा दिला होता; परंतु यंदा शिवसेनेने शिक्षक सेनेचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे (अंबरनाथ) यांच्या प्रचारासाठी मोहीम सुरू केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात खासदार विनायक राऊत हे श्री. म्हात्रे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी आघाडीने युती करीत कोकण मतदारसंघाची जागा शेकापसाठी सोडली आहे. शेकापचे बाळाराम पाटील येथून निवडणूक लढवीत आहेत. शेकापकडे कोकणातील दोन आणि राष्ट्रवादीकडे एक अशा तीन मोठ्या शिक्षण संस्था आहेत. त्याचा फायदा बाळाराम पाटील यांना मिळण्याची शक्‍यता आहे. श्री. पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेदेखील सध्या कोकण दौरा करीत आहेत, तर शेकापचे आमदार जयंत पाटील हेदेखील या आठवड्यात कोकणातील शिक्षकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या प्रचारासाठी आमदार कपिल पाटील यांनी कार्यक्रमांच्या निमित्ताने रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौरा सुरू ठेवला आहे. 

भाजपकडून दक्षता 
श्री. बेलसरे, श्री. म्हात्रे आणि श्री. पाटील या तिन्ही उमेदवारांनी शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांच्या विरोधात प्रचाराची आघाडी उघडली आहे; तर विद्यमान आमदार आणि बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांनाही अनेक शिक्षकांनी पाठिंबा दिला आहे. यात शिक्षक परिषदेच्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी भाजपकडून प्रचंड दक्षता बाळगली जात आहे.

Web Title: Teachers council election