वाढत्या उष्म्याने जिल्हाभर होरपळ

भूषण आरोसकर
बुधवार, 12 एप्रिल 2017

पारा ३७ अंशावर - रस्ते पडताहेत ओस; फळपिकांवरही परिणाम; पाणी पातळीत घट

सावंतवाडी - सिंधुदुर्गात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांत जिल्हावासीय वाढत्या उष्म्याने होरपळून निघत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा आज पारा ३६ अंश तर गेल्या आठवड्यात तब्बल ३७.५ अंश सेल्सियसवर गेला आहे. ग्रामीण भागात पाण्याच्या स्त्रोतांची पातळीत घट झाली आहे. येणारा मे महिना बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाईचे रूप धारण करणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पारा ३७ अंशावर - रस्ते पडताहेत ओस; फळपिकांवरही परिणाम; पाणी पातळीत घट

सावंतवाडी - सिंधुदुर्गात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांत जिल्हावासीय वाढत्या उष्म्याने होरपळून निघत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा आज पारा ३६ अंश तर गेल्या आठवड्यात तब्बल ३७.५ अंश सेल्सियसवर गेला आहे. ग्रामीण भागात पाण्याच्या स्त्रोतांची पातळीत घट झाली आहे. येणारा मे महिना बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाईचे रूप धारण करणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

फेब्रुवारीनंतर वातावरण सर्वसाधारणच राहिले. त्यात फारशा मोठ्या हालचाली दिसून आल्या नाहीत. तसेच पिकांनाही या काळात पोषक असे वातावरण राहिले होते, त्याचा फायदा आंबा, काजू बागायतींना झाला होता; मात्र गेल्या वीस दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. हा बदलाचे परिणाम दुसऱ्या टप्प्यात फळधारणा केलेल्या आंबा काजू बागायतींना झाला. विशेषत: आंब्याला त्याचा फटकाही बसला आहे. परिणामी उत्पादनात घट निर्माण झाली. हा आठवडा खऱ्या अर्थाने आग ओकणारा ठरला आहे. 

या आठवड्यात तब्बल पारा ३७.५ अंश सेल्सियसवर गेले आहे, तर चालू आठवड्याच्या या दोन-तीन दिवसांत हे तापमान ३६ अंशच्या खाली जाण्याचे नाव घेत नाही. पंधरा दिवसांपूर्वी कमाल तापमान ३३.५ ते ३४ अशा दरम्यान राहिले होते. 

या आठवड्यात तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण अशा मुख्य ठिकाणच्या बाजारपेठांतील शहरातील रस्ते सामसूम दिसून येत आहेत. 

लोकांनी सकाळी साडेदहानंतर घराबाहेर पडण्यासाठी लोक नाक मुरडत आहेत. भर दुपारी रस्त्यावर ‘सामसुम’ स्थिती निर्माण झाली आहे. शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागातही काही ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांना विशेषत: याचा फटका बसत आहे. काही ठिकाणच्या विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे, तर काही ठिकाणी विहीर कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत उष्णतेचा पारा ३४ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता; मात्र आता ३६ अंश पाऱ्याने सर्वांना होरपळून निघण्याची पाळी आली आहे.

दुकानातील थंड पेयेसुद्धा जिल्हावासीयांना उन्ह्याच्या तडाख्यापासून वाचवू शकत नसल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील काही भागात ढगही दाटून आले होते. वातावरणात असे अधूनमधून बदलही घडत असल्यामुळे जिल्ह्यातील बरेच नागरिक पावसाच्या आगमनाचाही अंदाज आतापासूनच बांधू लागले आहेत. 

आंबाही भाजला
वाढत्या उष्णताही जिल्हावासीयांच्या अंगाची लाही लाही करणारी ठरली. त्याचबरोबर आंबा पिकालाही मारकच ठरली. आंब्या पिकाला दमट हवामानाची गरज असते. प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणाऱ्या उष्णतेमुळे नवीन आलेला मोहोरही करपला गेला. तर चांगले फळधारणा केलेला आंब्याला आतून बराच भाजून निघाला, त्यामुळे बागायतदार मात्र चिंतेत आले. मध्येच जर पाऊस पडला तर चांगली फळधारणा केलेल्या आंब्यावर फळमाशी व करपा होऊ शकतो, असे मुळदे केंद्रांचे तंत्र अधिकारी राजेश मुळे यांनी सांगितले.

...तर मे मध्ये किती?
उष्णतेची प्रचंड झळ या एप्रिल महिन्यापासूनच बसत असल्याचे चित्र आहे. अजून उन्हाळ्याचा मे महिना अजून बाकी आहे. मेच्या उत्तरार्धात सह्याद्रीच्या पट्ट्यात व जिल्ह्यात पावसाचे आगमन होत असते. त्याआधी ३७.५ अंश सेल्सिअसचा पारा ४० अंशाच्या पार गेल्यास ते जिल्ह्यातील उष्णतेचे रेकॉर्ड ब्रेक ठरू शकते. तसा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे.

Web Title: temperature increase in sawantwadi