दहा अट्टल गुन्हेगार रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

खेड - वारंवार गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या खेडमधील दहा गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे. 

खेड - वारंवार गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या खेडमधील दहा गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे. 

खेड उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील व पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. हद्दपार केलेल्यांमध्ये दिनकर उर्फ बारक्‍या नागनाथ लोहार (वय 35), सुरेश प्रकाश लोहार (वय 27), प्रभाकर नागनाथ लोहार (वय 30), बाळाजी रामा लोहार (वय 25), माणिक नागनाथ लोहार (वय 37), मोहन शांताराम लोहार (वय 25), नागनाथ नारायण लोहार (65), अमोल प्रकाश लोहार (32, सर्व रा. उसरेवाडी, भडगाव, मूळ उस्मानाबाद), अनिकेत अनंत खेडेकर (वय 26, रा. भडगाव), अजय विठोबा चव्हाण (32, रा. चिंचघर) यांचा समावेश आहे.

टोळीने गुन्हेगारी केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. 2009 पासून खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये वारंवार गुन्हे करून तालुक्‍यात कायदा व सुव्यवस्था बिघडवत होते. त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार डॉ. मुंढे यांनी दहा गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी रविवारपासून (ता. 13) करण्यात आली आहे. ते जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास त्याची माहिती तत्काळ खेड पोलिस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. 

उपोषणावेळचे आश्‍वासन पाळले 
खेड येथील दोन पत्रकारांना 3 जूनला मारहाण व धमकी दिल्याप्रकरणातही हद्दपारीतील काही गुन्हेगारांचा समावेश होता. त्यांच्यातील संशयित आरोपींवर कारवाई करून, तालुक्‍यातील अवैध मटका व दारूधंदे बंद करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांनी 20 जूनला प्रांत कार्यालयासमोर केलेल्या उपोषणावेळी केली होती. त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी संबंधित गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करू, असे आश्वासन दिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten criminals deported from Ratnagiri district