बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार; सिंगापूरमध्ये घबराट

मुरलीधर दळवी
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मागील वर्षी दोन माणसांचे बळी घेतल्याने वन विभागाने त्या नरभक्षक बिबट्याला सिंगापूर परिसरात ठार मारले होते. त्याच परिसरात पुन्हा दुसऱ्या बिबट्याने  गुरुवारी एक बकरी तर सोमवारी एका बैलाला ठार मारले. पाच दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने लोकांमध्ये घबराट पसरली.

मुरबाड (जिल्हा ठाणे) : मुरबाड तालुक्यातील काट्याची वाडी (सिंगापूर) येथे जंगलात असलेल्या गुरांच्या गोठ्यात घुसून सोमवारी रात्री (ता. 30 ऑक्टोबर) बिबट्याने एका बैलाला ठार मारले. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

सह्याद्रीच्या पायथ्या लगत असलेल्या सिंगापुर (टेंभाचीवाडी) येथे 26 ऑक्टोबरला (गुरुवारी) रात्री बिबट्याने कमळू वाघ या आदिवासींच्या घरातील गोठ्यामध्ये घुसून बोकड पळवून ठार केला होता ही घटना ताजी असतानाच बिबट्याने तेथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काट्याची वाडी येथे बारकू गोविंद वाघ या आदिवासींच्या जंगलात असलेल्या गोठ्याचा कुड फाडून बैलाचा बळी घेतला आहे.

टेंभाची वाडी येथे बिबट्याचा माग घेण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेरे लावले होते परंतु तेथे बिबट्या आलाच नाही त्यामुळे आज रात्री काट्याची वाडी परिसरात जास्त कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी टी डी हिरवे यांनी सांगितले. गेल्या वर्षी याच भागात बिबट्याने दोन माणसांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याने वन वीभागाने त्या नरभक्षक बिबटयाला ठार मारले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: thane news murbad leopard kills bull