वीस वर्षांपासून अविरत सेवा देणारी ठाणे-पाली-कोशिंबळे बस सेवा अचानक बंद

अमित गवळे
शुक्रवार, 20 जुलै 2018

पाली (जि. रायगड) - मागील वीस वर्षांपासून अविरतपणे सेवा देणारी ठाणे-पाली-कोशिंबळे बस मागील दहा-बारा दिवसांपासून अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे चाळीसहुन अधिक गावांतील प्रवासी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. 1 तारखेपर्यंत बस सेवा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाज युवा संघटना सुधागड व ग्रामस्थांनी दिला आहे.

पाली (जि. रायगड) - मागील वीस वर्षांपासून अविरतपणे सेवा देणारी ठाणे-पाली-कोशिंबळे बस मागील दहा-बारा दिवसांपासून अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे चाळीसहुन अधिक गावांतील प्रवासी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. 1 तारखेपर्यंत बस सेवा सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाज युवा संघटना सुधागड व ग्रामस्थांनी दिला आहे.

ही बस लवकर सुरु करण्यात यावी यासाठी मराठा समाज युवा संघटना सुधागड व तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी (ता.18) पाली बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रकांना निवेदन दिले. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणेच्या वतीने सुद्धा सोमवारी (ता.16) राज्य परिवहन मंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयाच्या व्यवस्थापकांना याच मागणीचे निवेदन दिले आहे. 

ही बस सकाळी दहा वाजता ठाण्यातील खोपटवरून कोशिंबळयाला जाण्यासाठी सुटते. पालीतून ही गाडी कोशिंबळयाला जाते व पुन्हा पालीत येते आणि पालीतून साधारण तीन किंवा साडेतीन वाजता पुन्हा ठाण्याला जाण्यास निघते. त्यामुळे ही बस शहर आणि गावाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. नोकरदार, प्रवासी व विद्यार्थी यांची या बसमुळे चांगली सोय होते. गेली वीस वर्ष अखंडित पणे ही सेवा सुरु आहे. ती देखील फायद्यात. पाली येथे निवेदन देतांना रोहन दगडे, निलेश शिर्के, उमेश तांबट, किशोर दिघे, रघुनाथ धनावडे, प्रविण ओंबळे, एकनाथ हळदे आदी तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.

खरे कारण कोणते?
बस कमी आहेत तसेच आषाढी एकादशी निमित्त अतिरिक्त बस गाड्या लागल्या असल्याने ही बस देखील तिकडेच पाठविण्यात आल्याचे परिवहन मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खरे कारण रस्त्यावरील खड्डे असल्याचे बोलले जात आहे.

या बसमध्ये नेहमीच प्रवाश्यांची गर्दी असते. इतर ठिकाणी तोट्यात सुरु असलेल्या गाड्या परिवहन मंडळ सुरु ठेवते मात्र अत्यंत फायद्यात सुरु असलेली ही बस बंद का केली? ही बस लवकर पूर्ववर सुरु करावी. तसेच रस्ते देखील सुस्थितीत करण्यात यावेत. एक तारखे पर्यंत बस सुरळीत सुरु न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील.
रोहन दगडे, सरपंच, अतोणे-कोशिंबळे ग्रुपग्रामपंचायत.

वृद्ध आई-वडिलांचा संपर्क तुटला -
खेड्यापाड्यातील तरुण रोजगारसाठी ठाणे-मुंबईला स्थलांतरीत झाले आहेत. आपल्या मुलांना भेटण्यासाठी किंवा त्यांना एखादी वास्तु पाठवायची असेल तर ही बस थेट घरापासून मिळत होती. मात्र आता या वृद्ध आई-वडिलांना आपल्या काळजाच्या तुकड्यांना भेटणे अत्यंत गैरसोईचे व खडतर झाले आहे. - निलेश शिर्के, सचिव, मराठा समाज युवा संघटना, सुधागड

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Thane Pali koshibale bus service is stopped suddenly