esakal | सभागृहाचे पावित्र्य भंग करायचे असेल तर 'गेट आउट' I Political
sakal

बोलून बातमी शोधा

Chiplun : नगराध्यक्षांनी ‘गेट आउट’ म्हणताच सभागृह चूप

सभागृहाचे पावित्र्य भंग करायचे असेल तर 'गेट आउट'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : येथील पालिकेच्या सभेत झालेला गोंधळ, जोरदार खडाजंगी, प्रसंगी अरे तुरेची भाषा यामुळे संतापलेल्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी ‘गेट आउट’ म्हणत संबंधितांना जणू बाहेर जायचे आदेश दिले. भांडणतंटे करून सभागृहाचे पावित्र्य भंग करायचे असेल तर गेट आउट असे म्हणताच सारे सभागृह चिडीचूप झाले.

येथील नगर परिषदेची १८ ऑगस्टची तहकूब झालेली सभा २५ ऑगस्ट रोजी घेतली होती. मागील तहकूब सभेतील १ ते १४ विषय मंजुरीवरून महाविकास आघाडी व भाजप सदस्यांमध्ये गुरुवारी (ता.३०) झालेल्या सभेत जोरदार खडाजंगी झाली. अरेतुरेची भाषा आणि एकमेकांच्या पक्षाचा उद्गार करण्यात आला. नगरसेवक मोदी यांनी सभागृहात बैठक घातली. त्यावरूनही प्रचंड गोंधळ उडाल्याने नगराध्यक्ष सुरेखा खेराडे कमालीच्या संतापल्या. २५ ऑगस्टच्या सभेला आघाडीचे सदस्य गैरहजर होते व उशिरा आले. त्या सभेत शहरातील मागासवर्गीय वस्तीतील कामे तसेच शहरातील उद्याने साफसफाई व जंतूनाशक औषधे खरेदी असे १ ते १४ विषय मंजूर करण्यात आले होते.

परंतु आघाडी सदस्यांनी त्याला विरोध केला नंतर त्यापैकी १ ते ७ विषयांना मंजुरी देऊन ८ ते १४ या विषयाबाबत थेट जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. सभेत हा विषय चर्चेला येताच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी ८ ते १४ विषयाबाबत तक्रार असली तरी स्थगिती आलेली नसल्यामुळे प्रशासन आपले काम करेल, असे उत्तर देताच शशिकांत मोदी संतापले. मुख्याधिकारी चुकीचे उत्तर देत सभागृहाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करून तसे मत इतिवृत्तात नोंद करून घेण्याची मागणी केली. परंतु समिती लिपिक ते लिहून घेण्यास तयार नव्हते. येथेच ठिणगी पडली आणि सभागृहात जोरदार खडाजंगीला सुरवात झाली.

विजय चितळे आणि मोदी यांच्यामध्ये जोरदार जुंपली. मोदी यांनी आक्रमकपणे सभागृहाच्या मोकळ्या जागेत धाव घेऊन बैठक मांडली. जोपर्यंत माझे म्हणणे लिहून घेतले जात नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली. यामुळे वातावरण तापले. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप, एकेरी भाषेचा उपयोग, एकमेकांच्या पक्षाचा उद्गार असा ड्रामा रंगला. त्यामुळे नगराध्यक्षा संतापल्या. मोदी यांचे म्हणणे नोंद करून घेण्यात यावे. मोदी यांनी सभागृहात चुकीचे वर्तन केले म्हणून कारवाई करण्यात यावी, असा निर्णय नगराध्यक्षांनी दिला. प्रशासनाने कायद्याप्रमाणे आपले काम करावे, असेही सुनावले. यानंतर दूषित पाणी व रस्त्यावरील खड्डे याविषयी रात्री उशिरापर्यंत सभेत चर्चा करण्यात आली.

गढूळ पाण्याचा प्रश्न गाजला

पूरपरिस्थितीला दोन महिने झाले तरी नगर पालिका जॅकवेल व शहरातील बहुतांशी विहिरींना गढूळ पाणी आहे. या विषयावरूनही पालिका सभा गाजली. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता पेठे यांनी संबंधित ठेकेदार आजारी पडल्याने काम करणार नसल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे सांगितले. यावर पर्यायी ठेकेदार नेमण्याची मागणी करण्यात आली.

loading image
go to top