मंदिरातील दानपेटीसह दोन दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

चिपळूण - ओमळी येथे तीन ठिकाणी 12 हजार रुपयांची चोरी झाली आहे. यातील सोमजाई मंदिराच्या व्यवस्थापकांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र औषध विक्रेत्यासह किरकोळ दुकान चालविणाऱ्या महिलेने आपल्या दुकानातील चोरीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

चिपळूण - ओमळी येथे तीन ठिकाणी 12 हजार रुपयांची चोरी झाली आहे. यातील सोमजाई मंदिराच्या व्यवस्थापकांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र औषध विक्रेत्यासह किरकोळ दुकान चालविणाऱ्या महिलेने आपल्या दुकानातील चोरीबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही.

याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ओमळी येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात गावातील एका ग्रामस्थाला चादर, विडी, कॅडबरी चॉकलेटची पाकिटे, दारूच्या बाटल्या आणि कोयती सापडली. यातील कोयती गावचे ग्रामदैवत सोमजाई मंदिरातील असल्याचे लक्षात आल्यानंतर गावातील ग्रामस्थ मंदिरात गेले, तेव्हा मंदिरातील दानपेटी फोडल्याचे दिसून आले. मंदिरापासून काही अंतरावर एका महिलेचे दुकान आहे. भातकापणीमुळे या महिलेने काही दिवसांपासून दुकान बंद ठेवले होते. बुधवारी पाचशे रुपयांची नोट घेऊन ती महिला चिकनच्या आणण्यासाठी गेली. दुकानदाराने पाचशे रुपयाची नोट घेण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिला सुटे पैसे आणण्यासाठी आपल्या दुकानात आली, तेव्हा तिच्या दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. या दुकानापासून 25 फुटाच्या अंतरावर असलेल्या मेडिकलमध्येही चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्याने मंदिरातील कोयतीचा वापर करून ही चोरी केल्याचा अंदाज ग्रामस्थांनी बांधला आहे. मंदिराच्या दानपेटीतून 3 हजार रुपये, दुकानातून 2 हजार आणि मेडिकलमधून 7 हजार रुपये चोरले आहेत. दुकान आणि मेडिकलच्या चोरीची फिर्याद पोलिस ठाण्यात देण्यात आलेले नाही. दानपेटीच्या चोरीची फिर्याद गोपाळ सखाराम कदम यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली आहे. 8 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2016 च्या दरम्यान ही चोरी झाली आहे. पोलिस हवालदार श्री. नाटेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Theft in temple and shop

टॅग्स