टंचाईग्रस्त गाव-पाडयांनी गाठली चाळीशी

भगवान खैरनार
मंगळवार, 17 एप्रिल 2018

गतसाली 28 गावे आणि 60 पाडे असे एकूण 88 टंचाई ग्रस्त गाव-पाडयांचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला होता. तर याही वर्षी तेवढ्याच गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे.

मोखाडा - पालघर जिल्हयात सर्वात भिषण पाणी टंचाई ग्रस्त असलेल्या मोखाडा तालुक्यात एप्रिल च्या पंधरवड्यात टंचाई ग्रस्त गावपाड्यांनी चाळीशी गाठली आहे. त्यांना शासनाने 13 टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. तर चार गाव पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले असून, तालुक्यात एप्रिल अखेर टंचाईग्रस्त गाव-पाडे अर्धशतक ओलांडणार आहे. 

प्रतिवर्षी मोखाडा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यांपासुन पाणी टंचाईला सुरूवात होते. याही वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस पाणी टंचाई ला सुरवात झाली आहे. गतसाली 28 गावे आणि 60 पाडे असे एकूण 88 टंचाई ग्रस्त गाव-पाडयांचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला होता. तर याही वर्षी तेवढ्याच गाव पाड्यांचा आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. गतसालच्या तुलनेने यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे एप्रिलच्या पंधरवड्यात 26 पाडे आणि 14 गावे असे एकूण टंचाईग्रस्त गाव-पाडयांनी चाळीशी गाठली आहे. दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेने भुर्गबातील पाणी साठा कमी होत असल्याने, टंचाई ग्रस्त गाव-पाडयांची संख्या ही रोजच वाढत आहे. 

गतसालाएवढीच टंचाईग्रस्त गाव-पाडयांची आकडेवारी राहील असा पाणी पुरवठा विभागाने अंदाज वर्तविला आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाडे दिवसागणिक वाढत आहेत. केवनाळे, बनाचीवाडी, वाघवाडी आणि शेलमपाडा या चार गाव पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात टॅंकर मंजुरी साठी पाठविले आहेत. सध्यस्थितीत 40 गाव-पाडयांना 13 टॅंकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. गतसाली 88 गाव-पाडयांना 22 टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता. 
         
उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त झालेले असताना, पाणी टंचाईचे चटके आदिवासींना सोसावे लागत आहेत. शासनाच्या अटीप्रमाणे टॅंकरद्वारे विहीरीत पाणी सोडले जाते. त्यामुळे रणरणत्या उन्हात आदिवासी महिलांना सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: There are forty villages with scarcity