esakal | पाच वर्षांत २५ विमाने व्हावीत ; ज्योतिरादित्य शिंदे | Sindhudurga
sakal

बोलून बातमी शोधा

kudal

पाच वर्षांत २५ विमाने व्हावीत ; ज्योतिरादित्य शिंदे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : ‘‘विशाल असा सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरवशाली इतिहास परंपरा आहे. सिंधुदुर्ग विमानतळ आता नवीन इतिहास रचत आहे. येत्या पाच वर्षांत २० ते २५ विमाने सिंधुदुर्गात आली पाहिजेत, हा आमचा संकल्प आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी केले.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय, केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, आय. आर. बी. इन्फास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. (विकास) यांच्यातर्फे उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजनाअंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्गचा (चिपी) लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केंद्रीय सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या सोहळ्याला ज्योतिरादित्य शिंदे ऑनलाइन सहभागी झाले होते.

ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्याशी माझे संबंध राजकीय नाही, तर कौटुंबिक नाते आहे. गेली तीन दशके असलेले कोकणवासीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. माझे वडील माधवराव शिंदे यांचेही यात योगदान आहे. त्यांच्या स्वप्नातील हा विमानतळ आज पूर्ण होत असल्याचा मला आनंद होत आहे.’’

‘‘सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणचा कायापालट होणार आहे. आजपासून त्याची सुरुवात झाली. आता या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न व्हावा. त्यासाठी नेमके काय करायचे, ते तुम्ही बघून घ्या; मात्र तो दर्जा मिळवून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.

हेही वाचा: खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी काढलं;पाहा व्हिडिओ

सिंधुदुर्ग विमानतळ होण्यामागे अनेकांचे योगदान आहे. प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन हा प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यामुळे याचे श्रेय कोणा एकट्याला जात नाही.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

या विमानतळाचे भूमिपूजन शिवसेनेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते, तर उद्‌घाटन हे आजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले. यासाठी पायगुण लागतो. खासदार राऊत यांनी सातत्याने विमानतळासाठी पाठपुरावा केला आहे.

- सुभाष देसाई, उद्योगमंत्री

पर्यावरण जोपासत कोकणचा विकास करूया. सिंधुदुर्ग विमानतळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणी कसे येतील, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात रखडलेल्या दोन पंचतारांकित हॉटेलसह सी-वर्ल्डचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.

- आदित्य ठाकरे, पर्यटन व पर्यावरणमंत्री

ज्योतिरादित्यांचा अस्सल मराठीत संवाद

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या यांनी मराठीतून भाषण करावे, अशी अपेक्षा सूत्रसंचालन करताना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली. शिंदे यांनीही पूर्ण भाषण मराठीत केले. यात त्यांनी शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास, याचा आवर्जून आणि अभिमानाने उल्लेख केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली.

loading image
go to top