गड्या आपले फार्म हाऊस बरे!

पाली - नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी फार्म हाऊसना पसंती मिळत आहे. (छायाचित्र - अमित गवळे)
पाली - नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांसाठी फार्म हाऊसना पसंती मिळत आहे. (छायाचित्र - अमित गवळे)

थर्टी फर्स्टसाठी पसंती; नोटाबंदी इफेक्टही झिरो

पाली - सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सारेच सज्ज झाले आहेत. थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी अनेकांनी ग्रामीण भागातील निसर्गरम्य फार्म हाऊसला पसंती दिली आहे. सगळीच फार्म हाऊसफुल्ल झाली आहेत. 

खाण्या-पिण्याच्या खर्चावर नोटाबंदीचा फारसा परिणाम झालेला नाही. कॅटरर व हॉटेल व्यावसायिक धनादेश किंवा डेबिट कार्डाद्वारे पैसे स्वीकारत आहेत. 

उन्हेर (पाली)मधील चिंतामणी कॅटरर्सचे मालक शिवमूर्ती पवार यांनी सांगितले की, नोटाबंदीचा फारसा परिणाम जाणवत नाही. उलट मागील वर्षीपेक्षा दुपटीने ऑर्डर वाढल्या आहेत. सर्व साधनसामग्री गावातील दुकानांमधून खरेदी करत आहे. त्यांना धनादेशाने पैसे चुकते करतो.

ॲडव्हान्स किंवा ऑर्डरचे पैसे थेट ऑनलाईन स्वीकारतो आहे. सगळे व्यवहार धनादेश किंवा डेबिट कार्डने करत आहे. कामगारांचे पगार मात्र रोखीत द्यावे लागतात. अशा वेळी तीन-चार ऑर्डर झाल्यावर थेट दोन हजाराची नोट त्यांना देत आहे. बहुतांश ऑर्डर या फार्म हाऊसवाल्यांच्या आहेत.

मुंबई, पुणे आदी शहरांतील उच्च व मध्यमवर्गीयांचे; तसेच स्थानिकांचे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळांनजीक फार्म हाऊस आहेत. नवीन वर्षाचे स्वागत या फार्म हाऊसवर केले जाते. एरवी बंद असलेली ही फार्म हाऊस ३१ डिसेंबरच्या दोन दिवस आधी उघडतात. सध्या तेथे गजबज दिसून येत आहे. अनेक फार्म हाऊस मालक आपले कुटुंब, आप्तेष्ट व मित्रांसोबत थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल झाले आहेत. शहर, गर्दी, कोलाहल आणि प्रदूषणापासून दूर निसर्गरम्य ठिकाणी मनसोक्त मजा लुटण्यासाठी फार्म हाऊसपेक्षा दुसरी चांगली जागा नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

सुरक्षित आणि सोईचे
फार्म हाऊसवर कुटुंब, आई-वडील, पत्नी व मुले यांच्या समवेत सेलिब्रेशन करणे अनेकांना सुरक्षित वाटते. कारण कुठल्या तरी नवख्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये सुरक्षिततेची हमी नसते. त्यामानाने फार्म हाऊसमध्ये सुरक्षितता लाभते. अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता कमी असते. फार्म हाऊसवर पोहोचणे, तेथे राहणे, प्रवास करणे सोईचे ठरते.

मौज-मजा व आरामही
फार्म हाऊसवर मौज-मजा करताना थकवा आल्यास पाहिजे तेव्हा आराम करणे शक्‍य होते. आराम केल्यावर पुन्हा मौज-मजा करता येते. फार्म हाऊसवर विविध उपक्रम व खेळ घेता येतात. लहान मुले, वृद्ध यांच्यासाठी तर फार्म हाऊस खूपच लाभदायक ठरते.

पैशांची बचत
नोटाबंदीमुळे खिशात रोख रक्कम फारशी नाही. अशा वेळी आवश्‍यक त्या वस्तू डेबिट किंवा क्रेडिट कार्डने खरेदी करून सोबत आणणे शक्‍य आहे. आपल्या फार्म हाऊसवर थांबल्याने हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील अवास्तव खर्चाला आळा बसतो. फार्म हाऊस शहर किंवा गावापासून दूर असल्याने अनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीवरील खर्च कमी होतो.

वेळेचे बंधन नाही
फार्म हाऊसवर सेलिब्रेशन करण्यासाठी वेळेचे बंधन नसते. कोणीही केव्हाही सेलिब्रेशन करू शकते. शहर-गावापासून दूर असल्याने इतर कोणाला त्रास होण्याची शक्‍यता कमीच असते. मनसोक्त आनंद व मजा करता येते.

स्वतःच्या फार्म हाऊसवर कुटुंबासमवेत सेलिब्रेशन करणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी असलेले फार्म हाऊस थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी भाड्याने दिले आहेत. त्याचे भाडे ऑनलाईन स्वीकारले आहे. त्यामुळे नोटाबंदीचा त्रास जाणवला नाही. दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी फार्म हाऊसवर जातो. 
- विकी भऊड, फार्म हाऊस मालक, सुधागड.

आमचे स्वतःचे फार्म हाऊस आहे. दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तेथे कुटुंब व मित्रांसोबत येतो. अनेक पाहुणेही येतात. शहरात किंवा हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करण्यापेक्षा इथे खूप आनंद मिळतो. शिवाय वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात. कुटुंब व मित्र सगळेच सुरक्षित असतात. 
- उमंग मनियार, फार्म हाऊस मालक, मुंबई. 

आमचे स्वतःचे फार्म हाऊस नाही; पण मित्राच्या फार्म हाऊसवर नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणार आहे. दुसरीकडे कुठे जाण्यापेक्षा फार्म हाऊस सोईचे आणि चांगले वाटते. सर्व मित्र एकत्र येऊन खूप धमाल करतो. कोणत्याही अतिरिक्त वस्तू विकत आणाव्या लागत नसल्याने रोख पैसे खर्च करण्याचा प्रश्‍नच येत नाही.
- सुशील शिंदे, तरुण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com