थर्टी फर्स्टसाठी दीड लाख पर्यटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

अलिबाग - सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे हटके स्वागत करण्यासाठी सारे सज्ज होत आहेत. घरापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे बेत आखण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यभरातील पर्यटकांकडून रायगड जिल्ह्याला पसंती मिळत आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुमारे दीड लाख पर्यटक जिल्ह्यात येतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

अलिबाग - सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे हटके स्वागत करण्यासाठी सारे सज्ज होत आहेत. घरापासून दूर पर्यटनस्थळी जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे बेत आखण्यात आले आहेत. त्यासाठी राज्यभरातील पर्यटकांकडून रायगड जिल्ह्याला पसंती मिळत आहे. 31 डिसेंबरपर्यंत सुमारे दीड लाख पर्यटक जिल्ह्यात येतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल व लॉज यांचे बुकिंग यापूर्वीच फुल्ल झाले आहे. नववर्षानिमित्त नेहमीपेक्षा जास्त दर आकारण्यात येत आहेत. 24 डिसेंबरपासून जिल्ह्यात पर्यटक येण्यास सुरुवात होईल. समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, गड-किल्ले, थंड हवेची ठिकाणे यांना पर्यटकांनी पसंती दिली आहे. जिल्ह्यात सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. 

थर्टी फर्स्टची रात्र म्हणजे मजा, मस्ती, नाच, धिंगाणा आणि पार्ट्या असे सारे चित्र. त्यासाठी हॉटेल सज्ज झाली आहेत. विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांची तयारी केली जात आहे. डी.जे.च्या तालावर पर्यटकांना बेधुंद होऊन नाचता येणार आहे. ऑर्केस्टा, लहान मुलांच्या नाच-गाण्याचे विशेष कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. पार्ट्यांची जय्यत तयारी सुरू आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये कार्यक्रमानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क प्रति व्यक्ती एक हजार ते दोन हजार दरम्यान असेल. 

जिल्हा प्रशासनाची नजर 
मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी अनेक हॉटेल व्यावसायिक जिल्हा प्रशासनाची परवानगी घेत नाहीत. त्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडतो. हे टाळण्यासाठी अशा कार्यक्रमांवर जिल्हा प्रसासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके नियुक्त केली आहेत. 

पोलिस प्रशासन सज्ज 
नववर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी पार्ट्या रंगतात. मद्य पिऊन गाडी चालवल्याने अपघात होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे पोलिस ठिकठिकाणी वाहनचालकांची तपासणी करणार आहेत. त्यांच्याजवळील साहित्य, परवाने तपासले जाणार आहेत. नाताळच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतात. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग खबरदारी घेत आहे. 

या ठिकाणांना पसंती 
- समुद्रकिनारे : अलिबाग, किहिम, वरसोली, मांडवा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन 
- धार्मिक स्थळे : पाली बल्लाळेश्वर, महड वरदविनायक, हरिहरेश्वर शंकर मंदिर 
- गड-किल्ले : रायगड, जंजिरा 
- थंड हवेचे ठिकाण : माथेरान 

Web Title: Thirty First half million tourists