हजारो सिडबॉल्स रुजविण्याचा अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

रत्नागिरी - व्यवसाय करताना सामाजिक भान आणि जाणीव ठेवत रत्नागिरीच्या हॉटेल मत्स्यमने या पावसाळ्यात सिडबॉलच्या माध्यमातून औषधी आणि उपयुक्त झाडांची बी निसर्गात टाकण्याच्या उपक्रमासाठी हजारो सिडबॉल तयार केले आहेत.

रत्नागिरी - व्यवसाय करताना सामाजिक भान आणि जाणीव ठेवत रत्नागिरीच्या हॉटेल मत्स्यमने या पावसाळ्यात सिडबॉलच्या माध्यमातून औषधी आणि उपयुक्त झाडांची बी निसर्गात टाकण्याच्या उपक्रमासाठी हजारो सिडबॉल तयार केले आहेत. सिडबॉल निसर्गात टाकण्यासाठी मत्स्यम ग्राहकांबरोबरच विविध सामाजिक संघटना, मान्यवर व्यक्तींना सहभागी करून घेत आहे.

कोकणातील अनेक औषधी व उपयुक्त वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कोकणचे नष्ट होत असलेले हे वैभव वाचवण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलण्यासाठी मत्स्यमने हा उपक्रम हाती घेतला आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य घेत हजारो सिडबॉल तयार करून घेतले आहेत. विविध झाडांच्या बिया, गोमय माती आणि जीवामृत यांच्या माध्यमातून हे सिडबॉल्स तयार केले गेले आहेत.

सिडबॉल्समध्ये कोकणातील विविध औषधी व उपयुक्त झाडांच्या साडेआठ हजारांहून अधिक बिया आहेत. या उपक्रमात सर्वाधिक  वाटा उचलला आहे, तो सिंधुदुर्गातील वसंत काळे यांनी. गेली अनेक वर्षे वृक्षलागवड आणि संगोपनात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या वसंत काळे यांनी खूप मेहनतीतून जमवलेल्या हजारो बिया उपलब्ध करून दिल्या आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य मंडळीकडून जमा झालेले तीन हजारांहून अधिक सिडबॉल्स आता तयार झालेत. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मत्स्यमकडून सिडबॉल दिले जाणार आहेत. 

अनेक बियांचा समावेश 
या सिडबॉल्समध्ये आंजन, आवळा, काटेसावर, चारण, चिंच, पळस, बकुळ, बहावा, भोकर, वावडिंग, सुरमाड या आणि अशा अनेक बियांचा समावेश आहे. ग्राहकांना रस्त्यावरून जाताना माळरानावर किंवा जंगली भागात हे सिडबॉल्स फेकण्याची विनंती केली जाणार आहे. हे सिडबॉल्स जिथे पडतील, पावसात ते ठिसूळ होऊन त्यातील गोमय माती, जीवांवृत यामुळे बिया रुजतील व वाढतील, असे सचिन देसाई व पल्लवी माने-वजरेकर यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thousands of seed ball sowing special event