Photo : आता आम्ही कर्ज फेडणार कसे : कलिंगडाच्या गावात हजारो टन माल सडतोय

सचिन माळी
बुधवार, 25 मार्च 2020

; यावर्षी 18 शेतकर्‍यांनी सुमारे 145 एकरवर कलिंगड लागवड केली आहे. यातून मिळणार्‍या आर्थिक फायद्यामुळे स्थलांतरित होणारा आदिवासी बांधव एकाच जागेवर थांबला.

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी बांधवांनी केलेल्या कलिंगडाच्या शेतीत भयानक दृश्य दिसू लागले आहे. कोरोनामुळे व्यापार्‍यांनी मालाची उचल बंद केल्याने व सर्वत्र लॉगडाऊन करण्यात आल्याने उत्पादन व 145 एकर लागवडव्याप्त क्षेत्र यांचे गणित काढल्यास आजमितीस सरासरी 22 हजार 500 टन इतका माल शेतात तयार असून शेतातच पडून सडून जातो आहे. वर्षभराची उपजीविका अवलंबून असणार्‍या या शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून त्यांच्यावर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.

मालाला उचल नसल्याने तयार झालेली कलिंगडे शेतात पडून खराब होऊ लागली आहेत.

यावर्षी 18 शेतकर्‍यांनी सुमारे 145 एकरवर कलिंगड लागवड केली आहे. यातून मिळणार्‍या आर्थिक फायद्यामुळे स्थलांतरित होणारा आदिवासी बांधव एकाच जागेवर थांबला. परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी भाडेतत्त्वार घेवून कलिंगडाची शेती करू लागला. बँकेतून कर्ज पुरवठा अडचणींचा ठरत असल्याने सावकारी, खोती, बचत गटांचे कर्ज काढून यात उत्पन्नासाठी झटू लागला. यावर्षीही डिसेंबर महिन्यात स्थानिक व पेण येथील सतरा शेतकर्‍यांनी लागवड केली.

तिडेत 145 एकरवर कलिंगड लागवड

वाशी व अन्य मार्केटमधून मालासाठी मागणी करणारे व्यापारी गेल्या आठ दिवसांपासून येण्याचे बंद झाल्याने संकटात सापडले आहे. यंदा तिडे-आदिवासीवाडी येथे अठरा शेतकर्‍यांनी 145 एकर क्षेत्रात कलिंगडाची लागवड केली आहे. शेतकरी आपल्या शेतीत नोव्हेंबर महिन्यापांसून करीत असलेल्या मेहनतीला यंदा उत्तम उत्पन्नाची जोड मिळाली होती. त्यामुळे शेतकरी आनंदात होता. यंदा किमान दोनशे मोठ्या गाड्या माल विकला जाईल व त्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल असा शेतकर्‍यांचा अंदाज होता. तो चांगल्या पिकामुळे खराही ठरणार होता.

शेतकरी संकटात

मात्र मार्च महिना उगवला तो कोराना विषाणू संसर्गाच्या संकटाची सावली घेऊन. आजअखेर केवळ बारा गाड्या माल बाहेर गेला आहे. अनेक भरलेल्या गाड्या परत आल्या आहेत. मोठ्या बाजारपेठा बंद आहेत व स्थानिक बाजारपेठेत संचारबंदीमुळे मालच विकू शकत नाही. एका शेतकर्‍याचा राष्ट्रीयकृत बँकेच्या अर्थसहाय्य अपवाद वगळता प्रत्येक शेतकर्‍यावर दोन लाखपासून पाच लाखांपर्यतचा खासगीतून मिळवलेल्या कर्जाचा डोंगर आहे. शेतात पिक तयार आहे. चार दिवसात या समस्येवर तोडगा निघाला नाही तर पूर्ण पिकच शेतात जागेवर सडून जाण्याच्या संकट डोक्यावर उभे आहे. यासंदर्भात तालुका कृषी विभाग व महसूल विभागाने शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी पुढे येत असून त्यांना कर्जमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

लागवड केलेले शेतकरी व त्यांचे क्षेत्र

नागेश हिलम- 16 एकर, सुभाष पवार, कृष्णा हिलम- 11 एकर, प्रकाश काटेकर- 14 एकर, सुनील जगताप, काशीराम कोळी- 14 एकर, संदीप जगताप, मंगेश पवार- 7 एकर, लक्ष्मण पवार- 4 एकर, बाळाराम पवार- 5 एकर, सचिन येसरे- 5 एकर, पेण येथील प्रकाश पाटील- 10 एकर, कृष्णा जगताप- 3 एकर, लक्ष्मण पाटील- 18 एकर, दत्ताराम पाटील, पांडुरंग पाटील- 16 एकर, नथुराम पाटील- 7 एकर, महादेव म्हात्रे- 15 एकरवर तिडे येथे कलिंगडाची लागवड केली आहे.

शेतकर्‍यांना कर्जमाफी देत अडचणीतून बाहेर काढावे

कलिंगड शेतीची सर्व तंत्र आत्मसात करून गावातील शेतकरी जमीन भाडेतत्वावर कराराने मिळवून कलिंगडे पिकवतात. यंदा पिकाही चांगले असूनही कोरोनाचे संकटामुळे सर्वच शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीसाठी लागणारे भागभांडवल खासगीतून मिळवले आहे. या संकटामुळे पैसे परत करता येणे शक्य नसल्याने सावकरी विळख्यात शेतकरी अडकण्याची भिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या आपत्तीकडे शासनाने लक्ष देऊन शेतकर्‍यांना कर्जमाफी देत अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.
सुभाष पवार, राज्यशासन पुरस्कार प्राप्त शेतकरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of tonnes of cargo are decaying in mandangad kokan marathi news