धमक्‍या देणाऱ्यांचे दिवस संपले - राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मालवण - काँग्रेस नेत्यांकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवावे. धमक्‍या देणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. काँग्रेसने दादागिरीची भाषा आता विसरावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना काँग्रेसच जबाबदार राहील, असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिला. 

मालवण - काँग्रेस नेत्यांकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. हिंमत असेल तर त्यांना अडवून दाखवावे. धमक्‍या देणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. काँग्रेसने दादागिरीची भाषा आता विसरावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना काँग्रेसच जबाबदार राहील, असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिला. 

तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, उल्हास तांडेल, संतोष लुडबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. तेली म्हणाले,‘‘काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला व दादागिरीला जिल्ह्यातील जनता कंटाळली आहे. जिल्ह्यातून ही दादागिरी हद्दपार व्हावी, चांगले सरकार, कारभार देशात व राज्यात भाजपची सत्ता यावी, ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच शत्रू पक्ष आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी चांगले सरकार येण्यासाठी भाजप-शिवसेना युती होणे आवश्‍यक आहे. शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामोपचाराने युतीसाठी प्रयत्न करावेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन युतीबाबत मुंबईत निर्णय घेतला जाईल. काँग्रेसकडे नेतृत्व राहिले नसल्याने जिल्ह्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते-पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. हे घडत असतानाही काँग्रेस नेते शहाणे झाले नसल्याचे दिसून येत आहे.’’

आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश पाठवत कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे संबंधितांवर सायबर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत यासाठी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे, असेही श्री. तेली म्हणाले.

आचरेकर यांचा २७ ला प्रवेश
जरी वैचारिक मतभेद असले तरी भाजप पक्ष म्हणून या पक्षात गटातटाचे राजकारण नाही. संदेश पारकर व स्वतः पक्ष म्हणून एकत्र आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेसला कंटाळलेले पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळेच आज जिल्ह्यात भाजपची ताकद वाढू लागली आहे. २७ तारखेला कोलगाव येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असेही श्री. तेली म्हणाले.

Web Title: Threats over the rebellious days