शिकार करायला गेले अन् स्व:च शिकार झाले 

राजेश शेळके 
शुक्रवार, 10 जुलै 2020

रत्नागिरी वन विभागाने छापा टाकून शिकार्‍यांना जेरबंद केले.

रत्नागिरी - विद्युत तारेने शॉक देऊन डुकराची शिकार करणार्‍या तिघांना वन विभागाने अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी वन विभागाने छापा टाकून शिकार्‍यांना जेरबंद केले. आज सायंकाळी लांजा तालुक्यातील खेरवते येथे ही कारवाई झाली. मृत डुकरासह चार लोखंडी सुर्‍या, एक कोयता, 2 चार्जिंग बॅटरी, अ‍ॅल्युमिनियम वायर, बायंडिग वायर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

विशाल उद्धव चव्हाण (वय 30), विनोद केशव जाधव (वय 47), सुनील अनंत शिदें (40, सर्व रा. खेरवसे, ता. लांजा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी प्रकाश सकपाळ (रा. मालवण) यांच्या आंबा व नारळाच्या बागेत रान डुक्कराची शिकार करण्यासाठी विद्युत तारा लावून ठेवल्या होत्या. शॉक देऊन त्यांनी डुकराची शिकार केली. मात्र याची माहिती मिळताच रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, पाली वनपाल गौ. पी. कांबळे, लांजा सागर तपाडे, वनरक्षक जाकादेवी म. ग. पाटील, वनरक्षक लांजा विक्रम कुंभार यांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा रान डुकराला शॉक देऊन मारल्याचे दिसून आले. हे सर्वजण डुकराच्या मांसाचे तुकडे करण्यात आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार लोखंडी सुरी, एक कोयता, चार्जिंग बॅटरी 2, अ‍ॅल्युमिनियम वायर, बायंडिग वायर हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विभागीय वन अधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

तीन वर्ष शिक्षेची तरतूद

वन्यजीव संरक्षण अधिनिय 1972 अन्वये रानडुक्कर हा वन्यप्राणी अनुसुची 3 मध्ये येतो. त्याची शिकार केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for Prey of boar in ratnagiri