esakal | नशा बेतली जीवावर; चार तासात 3गुरख्यांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

a girl drowned and died in canal at Gadchiroli

नशा बेतली जीवावर; चार तासात 3 गुरख्यांचा मृत्यू

sakal_logo
By
- राजेश शेळके

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्यातील जैतापूर- दळे येथे आंबा बागेत काम करणाऱ्या तीन गुरख्यांचा एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार तासात पाठोपाठा तीन तरूण गुरख्यांचा मृत्यू झाल्याने अनेक तर्क वितर्क बांधले जात होते. दरम्यान या तिघांनीही नशा येण्यासाठी पाण्यामध्ये जीओ सॉलव्हंट मिसळुन प्यायले असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. आंबा फवारणीमध्ये आंब्याचा आकार वाढीसाठी जीओ सॉलव्हंट औषध वापरले जाते. त्याचा जादा डोस झाल्याने विषबाधा होऊन या तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.

गोविंद श्रेष्ठा (वय ३२), दीपराज पूर्णनाम सोप (वय ३९), निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी (वय ३८ रा. दळे जैतापूर) अशी मयत गुरख्यांची नावे आहेत. पहिल्या दोघांचा जिल्हा रुग्णालयात तर तिसऱ्याचा धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. काल रात्री ९ ते १ या चार तासात पाठोपाठ या तीनही गुरख्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तत्काळ जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे, राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे.

हेही वाचा: रत्नागिरीत 'या' तालुक्यात 3 हजार हेक्टर भातक्षेत्रात वाढ

तालुक्यातील दळे येथील सलीम काझी यांच्या बागेत हे तिन्ही नेपाळी कामगार काम करीत होते. रविवारी रात्री त्यांचा अकस्मिक मृत्यू झाला. अशी माहिती नाटे पोलीसांना देण्यात आली. निर्मलकुमार ऐनबहाद्दुर ठाकूरी हा रविवारी कामानिमित्त रत्नागिरीत गेला होता. दुपारनंतर तो दळे येथे बागेत परतला. मात्र त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नाटे येथील एका खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथून त्यांनी त्याला अधिक उपचारासाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथेच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यासोबत राहणाऱ्या गोविंद व दीपक या आणखी दोन सहकाऱ्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याना जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. आंबा बागायतदारांकडून आंबा फवारणी करताना आंब्याचा आकार वाढावा, यासाठी जीओ सॉलव्हंट औषध वापरले जाते. काझी यांच्या बागेतही गोदामात हे औषध होते. नशेसाठी तिघेही पाण्यातुन हे औषध घेत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

माहिती दिली असती तर

औषधाबाबत त्यांनी माहिती दिली असती तर त्यांच्यावर योग्य उपचार झाला असता. तिघेही बरे होऊ शकले असते. मात्र याबाबत त्यांनी काहीच माहिती न दिल्याने अचानक शरिरामध्ये विष भिनल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जीओ सॉलव्हंटच्या रिकाम्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या. आंबा बागेच्या मालकांसह अन्य सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवून घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top