बापरे! तीन बिबटे चक्क अंगणात

सकाळ वृत्तसेवा | Friday, 13 November 2020

गिम्हवणेत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली शहरात पाळीव जनावराप्रमाणे एक नव्हे, तर तीन बिबटे पहाटे अंगणातून फिरताना निदर्शनास आले. शहरात भरवस्तीत तीन तीन बिबट्यांचा वावर आढळल्याने ग्रामस्थ हादरले आहेत. या आधीही या भागात बिबट्या आढळला होता.

दापोली शहराजवळील गिम्हवणे गणपती मंदिराजवळील समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रकाश वैशंपायन यांच्या पत्नी या अंगणात गेल्या होत्या तेव्हा त्यांना त्यांच्या सारवलेल्या अंगणात श्वापदाच्या पायाचे ठसे आढळून आले त्यामुळे काल रात्रीचे सीसीटीव्ही चे चित्रीकरण पाहिले असता अंगणातून पहाटे ४.३० वाजणेच्या सुमारास त्यांच्या अंगणातून ३ बिबटया गेलेले आढळले, आज दुपरीही घराच्या मागे कुत्रे भुंकत होते त्यामुळे हे बिबटे घरामागील जंगलात असावेत असा कयास व्यक्त केला जात आहे.

  तीन बिबटे जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाल्याचे आढळून आल्याने गिम्हवणे गोडबोले आळीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, वनविभागाला ही माहिती देण्यात आली. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.गिम्हवणे गोडबोले आळीतील गणपती मंदिरामागे घनदाट जंगल असून, यापूर्वीही वैशंपायन यांच्या घराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्यरात्री अंगणातून जाताना बिबट्या चित्रित झालेला होता. ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती. त्यांनी जंगलात कॅमेरेही लावले होते. त्यानंतर बिबटे दिसायचे बंद झाले होते; मात्र आज पहाटे पुन्हा बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे.

Advertising
Advertising

हेही वाचा- तीन पाटलांची प्रतिष्ठा पणाला; आघाडीतील बिघाडी कोणाच्या पथ्यावर -

येथील ग्रामस्थांनी या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी वन विभागाकडे करूनही वन विभागाने पिंजरा काही लावला नसल्याची माहिती गोडबोले आळीतील ग्रामस्थ विलास कर्वे यांनी दिली आहे, आता बिबट्याचा वावर मनुष्य वस्तीत पुन्हा होऊ लागल्याने गोडबोले आळीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे याना सदर सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यात आले असून  रात्री गस्तीसाठी वनविभागाचे कर्मचारी गिम्हवणे गोडबोले आळीत पाठविण्यात येतील असे त्यानी सांगितले.

संपादन- अर्चना बनगे