निवसर येथे विहिरीमध्ये तीन जण गुदमरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

रत्नागिरी/लांजा - निवसर (ता. लांजा) येथे उपसा करण्यासाठी विहिरीमध्ये खाली उतरलेले तिघे गुदमरले. ही दुर्घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोकादायक असल्यामुळे त्या तिघांचे आतमध्ये नेमके काय झाले आहे हे समजू शकलेले नाही. तिघांना आतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

रत्नागिरी/लांजा - निवसर (ता. लांजा) येथे उपसा करण्यासाठी विहिरीमध्ये खाली उतरलेले तिघे गुदमरले. ही दुर्घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोकादायक असल्यामुळे त्या तिघांचे आतमध्ये नेमके काय झाले आहे हे समजू शकलेले नाही. तिघांना आतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आपत्ती निवारण यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

विजय श्रीपाद सागवेकर (४४, रा. निवसर, सोनारवाडी), नंदकुमार सीताराम सागवेकर (४२, सोनारवाडी), अनिल गोविंद सागवेकर (२७, रा. बाबर, खोचाडेवाडी) अशी विहिरीमध्ये गुदमरलेल्यांची नावे आहेत.

विहिरीमध्ये विषारी वायू तयार होऊन तसेच तेथे ऑक्‍सिजनची कमतरता असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी फिनोलेक्‍स कंपनीच्या आपत्कालीन पथकाला पाचारण केले होते रात्री उशिरा फिनोलेक्‍स कंपनीचे पथक येथे दाखल झाले.

निवसर सोनारवाडी येथील विजय सागवेकर हे आपल्या घराशेजारी असलेली विहीर उपसण्यासाठी दुपारी विहिरीत उतरले होते; परंतु बराच वेळ झाल्यानंतरही ते विहिरीतून बाहेर न आल्यामुळे त्यांच्यासमवेत असलेले दोन सहकारी नंदकुमार सीताराम सागवेकर, अनिल गोविंद सागवेकर हे दोघे विहिरीत उतरले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तिघेही विहिरीबाहेर न आल्यामुळे ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली. विहिरीत वाकून पाहिल्यानंतर तिघेही बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसपाटील दत्ताराम मिस्त्री यांनी पोलिसांना दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम सिंह पाटील, पोलिस कर्मचारी चेतन उतेकर, सुरेश शिरगावकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी विहिरीत तिघेही होते. तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अन्य ग्रामस्थांना खाली उतरवणे धोकादायक असल्यामुळे श्री. ढेरे यांनी फिनोलेक्‍स कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले होते. रात्री उशिरा फिनोलेक्‍सच्या पथकातील जवान तिघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. अंधार असल्यामुळे तिघांना बाहेर काढण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

या घटनेचे वृत्त निवसरसह पंचक्रोशीत बसल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीजवळ मोठी गर्दी केली होती. याच कालावधीत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनीही ही घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या. विहिरीमध्ये गुदमरलेले तिघेही एकाच वाडीतील असल्यामुळे निवसर सोनारवाडी चिंताग्रस्त बनली आहे. विहिरीत उतरलेल्या तिघे नेमके कशामुळे गुदमरले याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

मृत्यू झाल्‍याची शक्‍यता
विहिरीमध्ये अडकलेल्या तिघांना अद्यापही बाहेर काढण्यात आलेले नव्हते. तिघांची कोणतीही हालचालही होत नव्हती. तिघेही बेशुद्ध पडल्याचे उजेड होता तोपर्यंत वरून दिसत होते. याबाबत पोलिसांना विचारले असता तिघांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता त्यांनी वर्तविली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three serious due to Breathing problem in well in Nivsar