तिलारी घाट बनलाय जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

दोडामार्ग - तीव्र उतार आणि धोकादायक वळणांचा तिलारी घाट रस्त्यात पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे जीवघेणा बनला आहे. मुळात या घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे, तरीही शेकडो वाहने याच घाटातून ये-जा करतात. वाहन चालक स्वतःबरोबरच प्रवाशांचे जीवही धोक्‍यात घालत आहेत.

दोडामार्ग - तीव्र उतार आणि धोकादायक वळणांचा तिलारी घाट रस्त्यात पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे जीवघेणा बनला आहे. मुळात या घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे, तरीही शेकडो वाहने याच घाटातून ये-जा करतात. वाहन चालक स्वतःबरोबरच प्रवाशांचे जीवही धोक्‍यात घालत आहेत.

तिलारी घाटात शनिवारी (ता. २४) मध्यरात्रीनंतर झालेला अपघात व त्यात ठार झालेला दुर्गा भाजीवाला हा खराब रस्त्याचाच बळी मानावा लागेल. तिलारी घाटातून काढलेला तिलारीनगर ते वीजघर दरम्यानचा रस्ता खासगी आहे. वीजघर येथे विद्युत निर्मिती केंद्र आहे. तिलारीनगरहून वीजघर येथे सामुग्रीची ने-आण करण्यासाठी बनवलेला तो रस्ता आहे. तो खासगी वापरासाठीच तेव्हा बनविण्यात आला होता. सुमारे सात किलोमीटरचा घाटरस्ता अनेक जीवघेणी वळणे व तीव्र चढ-उतारांचा आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर ज्या वळणावर अपघात झाला त्या वळणावर अनेक अपघात झाले आहेत. अनेकांचे प्राणही गेले आहेत. तीव्र उतार व धोकादायक वळण त्या अपघातांना कारणीभूत आहे. तसाच तिथला खराब खड्डेमय रस्ताही कारणीभूत आहे.

त्या घाटातून वाहनांना बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतुकीस परवानगी नाही. अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळणार नाही. तरीही एसटी गाड्या, अवजड वाहने, डंपर या मार्गाने बिनधास्त ये-जा करीत आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस, महसूल व बांधकाम विभागाला अवजड वाहनांना रोखण्याचे आदेश दिले होते. तरी आजही त्या घाटातून अवजड वाहने ते आदेश धाब्यावर बसवून पोलिसांच्या कृपेमुळे राजरोस ये-जा करीत आहेत. घाटाच्या पायथ्याशी असलेला ‘अवजड वाहनांना प्रवेश बंद’चा फलक नुसता धुळ खात पडला आहे. त्याला कुणीही गंभीरपणे घेत नसल्याने वाहनांची ये-जा सुरू आहे आणि अपघातांची मालिकाही. वाहन चालकांची बेपर्वाई जशी अपघातांनी कारणीभूत आहे, तसा तिलारी घाटातील खड्डेमय धोकादायक रस्ताही कारणीभूत आहे. तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी एकतर रस्ता दुरुस्ती करावा, अन्यथा अवजड वाहनांना बंद करावा अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.

दुरुस्तीच्या मर्यादा
खासगी कंपनीने बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर टोल नाका उभारावा अशी ‘तिलारी’ प्रकल्पाधिकाऱ्यांची इच्छा होती, पण वाहनांची कमी संख्या त्यातून मिळणारा अत्यल्प टोल आणि रस्ता बांधणीसाठी येणारा अवाढव्य खर्च याचा विचार करून कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे दुरुस्तीचा ताण तिलारी प्रकल्पावरच येतो आणि सध्या तो रस्ता ते वापरत नसल्याने खर्च करताना हात आखडता घेतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था भयावह आहे.

बिनदिक्कत वाहतूक
घाटातून होणारी डंपरची वाहतूक तत्काळ थांबवावी, असे आदेश देऊनही वाहतूक सुरू का असा प्रश्‍न पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस निरीक्षक रणजित देसाई यांना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या समक्षच विचारला होता. तसेच त्यांना ‘सस्पेंड’ करण्याचा गर्भित इशाराही दिला होता. तरीही बिनदिक्कतपणे डंपर वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे रस्ताची दिवसेंदिवस चाळण होत आहे.

Web Title: tilari ghat dangerous