तिलारी घाटाची अनिश्‍चितता कायम

प्रभाकर धुरी
शनिवार, 20 जुलै 2019

घाट कोसळलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत घालण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घाटरस्ता खचला तेथे तीव्र उतार आहे. माती भुसभुशीत असल्याने ती पावसात वाहून गेली. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना तेथे टिकणारी नाही. हे काम १७ ऑगस्टपर्यंत 
पूर्ण होईल.
- श्री. मांजरेकर,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, चंदगड

दोडामार्ग - जवळपास पाच कोटी रुपये खर्च केलेल्या तिलारी घाटाची वाट नियोजनशून्य कारभारामुळे बिकट झाली आहे. सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर आणि कर्नाटक यांना जोडणारा जवळचा रस्ता मुसळधार पावसात कोसळला आणि हजारो वाहनचालकांची त्रेधा उडाली. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्याबाबत १७ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन सार्वजनिक बांधकामने निश्‍चित केली असली तरी आतापर्यंतचा कारभार पाहता यामागची अनिश्‍चितता कायम आहे. त्यामुळे अनेक घटक प्रभावित झाले.

तिलारी घाटाची निर्मिती झाली ती वीजघर येथील तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी. चंदगड तालुक्‍यातील तिलारीनगर येथे कार्यालये तर वीजनिर्मिती प्रकल्प पायथ्याशी; मध्ये सह्याद्री रांगेत अाढळ उभा असलेला सात किलोमीटरचा घाट. त्यातून मार्ग काढायचा म्हणजे अग्निदिव्यच! त्यामुळे सुरवातीची काही वर्षे चंदगड, आंबोली, सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग, तिलारी वीजघर या मार्गाने यंत्रसामुग्री आणली जायची पण त्यासाठी वेळ आणि खर्च खूप लागायचा. त्यामुळे खासगीरित्या तिलारी घाट खोदण्यात आला. जीवावरची जोखीम पत्करून चालक अवजड वाहने आणि यंत्रे घेऊन घाट उतरायचे. मुळात वीजनिर्मिती प्रकल्प आहे तो सह्याद्रीच्या पोटात. अगदी भुयारात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी रस्ता उभारण्याचे प्रकल्पाचे अभियंता आणि शासनासमोर तगडे आव्हान होते. ते त्यांनी लिलया पेलले. रस्ता आणि प्रकल्प दोन्ही प्रत्यक्षात आले. 
त्या खासगी घाटरस्त्याचा वापर मात्र सर्वजण करू लागले. घाटात जीवघेणी नागमोडी वळणे, तीव्र उतार असल्याने अवजड वाहने आणि सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आली; पण अवजड वाहनांसह कोल्हापूर, चंदगड, सावंतवाडी, वेंगुर्ले आगाराच्या एसटी गाड्या स्वतःच्या जोखमीवर धावत होत्या. मधल्या काळात घाटात अनेक अपघात झाले. अनेकांचे बळी गेले. लाखोंची वित्तहानी झाली. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्याचा मुद्दा ठळक बनला. बीओटी तत्त्वावर रस्ता बनवण्याचा प्रस्ताव पुढे आला, पण वाहतूक कमी असल्याने घातलेला पैसा वसुलीची खात्री नसल्याने ठेकेदार पुढे येईनात.

दुसरीकडे रस्ता खासगी असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर निधी खर्च घालण्यास असमर्थता दाखवली. अखेर पालकमंत्री तथा वित्त व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन बांधकामकडे साडेतीन कोटी वर्ग केले आणि घाटरस्ता बांधकामच्या ताब्यात गेला. साडेतीन कोटीत रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्यात आले. त्यानंतर दोडामार्गवासीयांनी कठडे, गटार  बांधणे, वळणे रुंद करणे यासाठी निधीची मागणी केली. तीही मंत्री केसरकर यांनी पूर्ण केली. घाटरस्ता सुरक्षित बनला. चोर्ले आणि आंबोली घाटातून जाणारी वाहने जवळचा रस्ता म्हणून तिलारी घाटातून धावू लागली; पण पहिल्याच मुसळधार पावसांत अर्धा अधिक घाटरस्ता वाहून गेला आणि घाटाच्या धोकादायक स्थितीमुळे वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागली.

याच घाटातून खासगी मोबाईल कंपनीची केबल दोडामार्ग, गोव्याकडे नेण्यात आली. त्या ठेकेदाराने रस्त्याची बाजूपट्टी खोदून केबल घातली; मात्र पुन्हा बाजूपट्टी पूर्ववत अथवा मजबूत केली नाही. त्यामुळे भुसभुशीत झालेली माती तीव्र उतार आणि मुसळधार पाऊस यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर रस्त्यासकट वाहून गेली. पाणी जाण्यासाठी नसलेले गटारही त्यास कारणीभूत ठरले.

बांधकाम विभाग आणि जिओच्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा त्याला जबाबदार ठरला. चंदगडच्या बांधकाम उपअभियंत्यांनी १७ ऑगस्टपर्यंत आरसीसी भिंत उभारून रस्ता आणि वाहतूक पूर्ववत करण्याची लेखी ग्वाही चंदगड तहसीलदारांना दिली आहे; पण मुसळधार पाऊस आणि कामाला लागणारा वेळ पाहता त्यांनी दिलेली डेडलाईन प्रत्यक्षात येईल की नाही याबाबत शंका नक्की आहे.

घाट कोसळलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत घालण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी घाटरस्ता खचला तेथे तीव्र उतार आहे. माती भुसभुशीत असल्याने ती पावसात वाहून गेली. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना तेथे टिकणारी नाही. हे काम १७ ऑगस्टपर्यंत 
पूर्ण होईल.
- श्री. मांजरेकर,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम, चंदगड

जेवण महागले
रस्ता बंद झाल्याने गोवा आणि सिंधुदुर्गची कर्नाटक आणि कोल्हापूरशी असलेली नाळ तुटली. कोल्हापूर, बेळगावशी गोवा सिंधुदुर्गची जवळीक. सिंधुदुर्ग आणि गोव्यात चिकनचा पुरवठा कोल्हापूर कडून तर भाजीचा पुरवठा बेळगावमधून होतो. दररोज कित्येक गाड्या या मार्गाने अहोरात्र धावायच्या. आता त्यांना दुसऱ्या दूरच्या मार्गाने येजा करावी लागत असल्याने जीवनावश्‍यक भाजीपाल्याचे दर आकाशाला भिडले आहेत. सर्वसामान्यांचे रोजचे जेवण महागले आहे. बेळगाव कोल्हापूरमध्ये उपलब्ध वैद्यकीय सेवा मिळवणेही घाटरस्त्याअभावी अडचणीचे ठरते आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा रोटीबेटीच्या आणि व्यवसाय उदिमाच्या निमित्ताने एकत्र आलेत; पण  घाटाची वाट बिकट झाल्याने असंख्य अडचणींचा सामना वाहनचालक आणि प्रवाशांना करावा लागतो आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tilari Ghats uncertainty persists