उमेदवार शोधताना दमछाक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

आदिवासीबहुल असलेल्या गटांत सुपरिचित उमेदवार शोधणे जड जात आहे...

नेरळ - कर्जत तालुक्‍यात रायगड जिल्हा परिषदेसाठी सहा गट असून, त्यातील तीन गट हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या जागांवर मतदारांना परिचित असलेले उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांची दमछाक होताना दिसत आहे. तीन गटांत केवळ दोन नावे पुढे आली आहेत. तालुक्‍यात सक्षम आणि चांगली प्रतिमा असलेले उमेदवार शोधणे ही राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

तालुक्‍यातील सावेळे, नेरळ आणि उमरोली हे जिल्हा परिषदेचे तीन गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहेत. २०१२ मध्ये तालुक्‍यातील पाचपैकी दोन गट शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एक शेतकरी कामगार पक्षाने जिंकला होता. उमरोली गटाचे दोन गट झाले आहेत. नव्याने तयार झालेले उमरोली आणि सावेळे हे दोन्ही गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. त्यातील सावेळे हा महिलांसाठी राखीव आहे. त्या गटात असलेल्या आठ ग्रामपंचायतींपैकी सात शिवसेनेच्या आणि एक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद लक्षात घेता अन्य पक्षांत सक्षम उमेदवाराची जोरदार चाचपणी सुरू आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य उत्तम कोळंबे यांच्या भावजय सहारा संदीप कोळंबे यांची उमेदवारी जवळपास निश्‍चित झाली आहे. राष्ट्रवादी, भाजप, मनसे व शेकापकडून उमेदवारांचा शोध सुरू आहे. 

उमरोली गटातही अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. या भागात ३५ आदिवासी समाज असतानाही कोणत्याही राजकीय पक्षाला सक्षम उमेदवाराचा शोध अजून लागलेला नाही. कर्जत पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सुवर्णा बांगरे या राष्ट्रवादीच्या असूनही त्यांच्या नावाची चर्चाच नाही. जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सुरेश टोकरे यांचे गाव या गटात असल्याने सध्यातरी राष्ट्रवादी निर्धास्त दिसून येते. या गटातील गावांचा विचार करता संभाव्य राष्ट्रवादी-शेकाप आघाडी आणि शिवसेना, मनसे, भाजप यांच्याकडून कोणती रणनीती आखली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. समोरच्या पक्षाचा उमेदवार कोण याकडे सर्वच पक्ष लक्ष ठेवून आहेत. किरवली, माणगाव, दहिवली या तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि कोल्हारे शेकापकडे आहे. आसल, चिंचवली, उकरूळ, उमरोली या चार ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. या गटात मात्र शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आदिवासी मतदार बाहेरचा उमेदवार स्वीकारतील का, हा प्रश्‍न कायम आहे. 

शिवसेना-काँग्रेस युती?
नेरळ हा आणखी एक गट अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. तेथे काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अनसूया पादीर यांचे नाव चर्चेत आहे. विद्यमान सदस्य असलेली राष्ट्रवादी काँग्रेस, स्वबळाची भाषा करणारे भाजप, शिवसेना, मनसे आपले पत्ते उघड करताना दिसत नाहीत. पादीर या कदाचित शिवसेना-काँग्रेस युतीच्या उमेदवार असतील अशी चर्चा आहे. नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्य मीना पवार यांनीही शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे.

Web Title: Tiring finding candidates