तिवरे पुनर्वसनाचे दोन राष्ट्रवादी नेत्यांच्या कंपन्यांना कंत्राट 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

गतवर्षी 2 जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर पायथ्याशी असलेली भेंदवाडी उद्‌ध्वस्त झाली होती. या दुर्घटनेत अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. 22 जणांचे बळी गेले. 45 कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली.

चिपळूण ( रत्नागिरी ) - तिवरे धरण दुर्घटनेनंतर पुनर्वसनाचे काम रखडले होते. तब्बल 15 महिन्यांनी बाधितांच्या पुनर्वसन वसाहतीच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला. सिद्धिविनायक ट्रस्टने मंजूर केलेल्या एकूण 11 कोटी रुपयांच्या निधीतून प्रथम 24 घरे बांधण्यात येत आहेत. घर बांधणीच्या दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या कंपनीला मिळाली आहेत. अलोरे येथे बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली जागेची साफसफाई सुरू असून लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे. 

गतवर्षी 2 जुलैच्या रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर पायथ्याशी असलेली भेंदवाडी उद्‌ध्वस्त झाली होती. या दुर्घटनेत अपरिमित आर्थिक व जीवितहानी झाली. 22 जणांचे बळी गेले. 45 कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. या कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपाची मदत झाली असून, काही महिन्यांपूर्वी येथील वाहून गेलेली जॅकवेल पुन्हा उभारून पाणी योजना पूर्ववत झाली. आता पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे. पुनर्वसन, रस्ते, पूल, साकवांसह धरण पुनर्बांधणी याची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये मुख्यत: बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जात आहेत. 

सुरवातीला एक मॉडेल घर तयार करण्यात येणार आहे. तपासणीनंतर उर्वरित घरांच्या कामांना सुरवात होणार आहे. अलोरे येथे कोयना प्रकल्प वसाहतीतील पडीक जागेत 1.60 हेक्‍टरवर पुनर्वसन करण्यात येत आहे. पाणी, वीज, बाजारपेठ, शाळांसह सर्व सोयीसुविधांयुक्त ही जागा महत्वाची आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 3 कोटी 80 लाख रुपये खर्चाच्या 24 घरांसाठीच्या 2 निविदा काढल्या होत्या. ऑनलाइन निविदा प्रक्रियेत झालेल्या स्पर्धेत दोन्ही निविदांची कामे राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळाली आहेत. तूर्तास 24 घरांचा प्रश्न सुटला आहे. एकूण 40 कुटुंबांचे पुनर्वसन होणार असल्याने काहीजणांना गावातच राहायचे असल्याने त्यांच्या जागेचा शोध सुरू आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiware Rehabilitation Contract To NCP Leaders Companies