राजन साळवींची एसीबीकडून साडेचार तास चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजन साळवींची एसीबीकडून साडेचार तास चौकशी
राजन साळवींची एसीबीकडून साडेचार तास चौकशी

राजन साळवींची एसीबीकडून साडेचार तास चौकशी

sakal_logo
By

राजन साळवी यांची
साडेचार तास चौकशी
अलिबागमध्ये ‘लाचलुचपत’कडून प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची बुधवारी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी साडेचार तास चौकशी केली. चौकशीत राजन साळवी यांच्याकडून त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाची साधने, व्यवसायाबद्दलची माहिती घेण्यात आली. उर्वरित माहितीसाठी तपासिक अधिकाऱ्यांनी सहा फॉर्म दिले असून त्याद्वारे ही सविस्तर माहिती २० जानेवारीपर्यंत देण्याची मुदत देण्यात आली आहे.
साळवी यांच्यासमवेत शेकडो शिवसैनिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी देत शक्तिप्रदर्शनही केले. राजन साळवी यांची सोमवारी (ता. ५) अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली जाणार होती; मात्र, ते आले नव्हते. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर राजन साळवींची, त्यांच्या बंधूंची, मुलांची, नातेवाईकांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. चौकशीला सामोरे गेल्यानंतर प्रतिक्रिया देताना राजन साळवी यांनी सांगितले की, वेंगुर्ल्यातील सनी नलावडे नामक व्यक्तीने ठाणे कार्यालयात माझ्याविरोधात तक्रार केली. यावरून एसीबीने चौकशी सुरू केली आहे. यावर राजन साळवी यांनी मी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी करणार का, असा प्रश्न एसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारल्याचे साळवी यांनी सांगितले. एसीबीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करताना, ते जी माहिती मागतील ती माहिती देण्यास मी तयार आहे. एसीबीने सहा फॉर्म दिले असून यामध्ये मालमत्तेसंदर्भात विचारलेली माहिती २० जानेवारीपर्यंत देण्याची मुदत एसीबीने दिली आहे.

ठाकरे गटाला अडकवण्याचा प्रयत्न
भ्रष्टाचाराच्या आरोपात फसवून शिवसेनेचा आवाज बंद होऊ शकणार नाही. ‘शिवसेना’ या चार अक्षरी शब्दांत काय ताकद असते, ते दाखवून देण्यास शिवेसेनेचे कार्यकर्ते सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचा खटाटोप सत्ताधारी शिंदे, फडणवीस सरकारने सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला.