बुद्धिबळ स्चर्धा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्धिबळ स्चर्धा..
बुद्धिबळ स्चर्धा..

बुद्धिबळ स्चर्धा..

sakal_logo
By

राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

चितलांगे, मखिजा आघाडीवर

वंतिका, दिव्या, मेरी व विश्‍वा द्वितीय स्थानावर

हातकणंगले, ता. २९ ः संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे-रुकडी (ता. हातकणंगले) येथे सुरू ४८ वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीनंतर आठवी मानांकित आंतरराष्ट्रीय महिला मास्टर औरंगाबादची साक्षी चितलांगे व विसावी मानांकित मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर अश्ना मखिजा या दोघी चार गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय महिला ग्रँडमास्टर दिल्लीची वंतिका अग्रवाल, द्वितीय मानांकित गतविजेती महिला ग्रँडमास्टर नागपूरची दिव्या देशमुख, चौथी मानांकित महिला ग्रँडमास्टर मेरी आना गोम्स (पेट्रोलियम स्पोर्टस्‌ बोर्ड) व मुंबईची विश्‍वा शहा या चौघींजणी साडेतीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. तृतीय मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर पेट्रोलियम स्पोर्टस्‌ बोर्डची सौम्या स्वामीनाथन व पाचवी मानांकित अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय मास्टर गोव्याची भक्ती कुलकर्णीसह एकूण १६ जणी तीन गुणांसह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत. स्विस लीगने एकूण ११ फेऱ्यात होणाऱ्या या स्पर्धा ५ जानेवारीपर्यंत चालणार आहेत. दररोज सकाळी साडेदहा वाजता सामन्यास सुरुवात होते.
पहिल्या पटावर महाराष्ट्राच्या महिला फिडे मास्टर वृषाली देवधर व आंतरराष्ट्रीय महिला मास्तर साक्षी चितलांगी यांच्यात इंग्लिश ओपनिंग प्रकाराने सुरू झालेल्या प्रेक्षणीय लढतीत दोघांनीही तोडीस तोड चाली रचत डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवी साक्षीने अंतिम पर्वात उंट व घोड्याच्या सुंदर चाली रचत डावावर निर्णायक वर्चस्व ठेवले व ४७ व्या चाली अखेर वृषालीला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. दुसऱ्या पटावर पश्‍चिम बंगालची मानांकित ब्रिस्टी मुखर्जी व महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय मास्टर अश्ना मखिजा यांच्यातील प्रदीर्घ लढतीत डावाच्या मध्यात अश्नाने वर्चस्व राखत ब्रिस्टीचा बचाव भेदला व अखेर ५६ व्या चालीला विजय संपादन केला. तिसऱ्या पटावर अग्रमानांकित दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय महिला मास्टर वंतिका अग्रवाल व महाराष्ट्रची ऋतुजा बक्षी यांच्यातील डावात अनुभवी वंतिकाने हत्ती व उंटाच्या नेत्रदीपक चाली रचत डावावर निर्णायक वर्चस्व राखले व ५५ व्या चालीस ऋतुजावर मात केली.
चौथ्या पटावर गतविजेत्या नागपूरच्या महिला ग्रँडमास्टर दिव्या देशमुख विरुद्ध केरळच्या निम्मी जॉर्ज यांच्यातील डावाच्या मध्यपर्वात मजबूत स्थिती धारण करत दिव्याने ६७ व्या चालीस निम्मीला डाव सोडण्यास भाग पाडले. पाचव्या पटावर पेट्रोलियम स्पोर्टस्‌ बोर्डच्या आंतरराष्ट्रीय महिला मास्टर सौम्या स्वामीनाथन विरुद्ध आंध्र प्रदेशच्या मोनिका बोमानी यांच्यात झालेल्या लढतीत मोनिकाने सौम्याला बरोबरीत रोखले. जळगावच्या सानिया तडवीने पेट्रोलियम स्पोर्टस्‌वरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर निशा मोहताला बरोबरीत रोखले. तर तेलंगणाच्या कीर्ती गंटाने आयुर्विमा महामंडळाच्या महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटेला बरोबरीत रोखून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.