
इस्लामपूर : व्हॉलीबॉल स्पर्धा निकाल
फोटो 08041
इस्लामपूर : येथील २४ व्या यूथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध पंजाब या मुलींच्या अटीतटीच्या लढतीतील एक क्षण.
महाराष्ट्र मुली, मुलांचा संघ विजयी
यूथ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा; प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्या, घोषणांचा निनाद
इस्लामपूर, ता. १२ : महाराष्ट्राच्या मुलींच्या आणि मुलांच्या संघांनी बलाढ्य पंजाब व चंदीगडच्या संघावर क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत क्रीडारसिकांची वाहवा मिळविली. क्रीडारसिकांनी या दोन्ही सामन्यांना प्रचंड गर्दी करीत टाळ्या, शिट्या आणि घोषणांच्या निनादात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इस्लामपूर (जि. सांगली) येथील लोकनेते राजारामबापू पाटील क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, युवानेते प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली २४ वी यूथ राष्ट्रीय पुरुष व महिला स्पर्धा सुरू आहे. आशियाई व्हॉलीबॉल महासंघ व व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष रामअवतार सिंग जाखड, व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांची या स्पर्धेस प्रमुख उपस्थिती आहे.
महाराष्ट्राच्या मुलांची चंदीगडच्या मुलांशी अटीतटीची लढत झाली. पहिल्या सेटला दोन्ही संघ अगदी बरोबरीने होते. प्रत्येक गुणासाठी दोन्ही संघ निकराची झुंज देत होते. महाराष्ट्र संघाने अप्रतिम खेळ करीत पहिला, दुसरा आणि तिसरा सेट थोड्या-थोड्या फरकाने जिंकत चंदीगडला मात दिली. सूरज राठोड, केशव गायकवाड, आदित्य हेगडे, सागर चव्हाण, चेतन बालबुधे यांच्यासह सर्व खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.
मुलींचा महाराष्ट्र संघ पंजाबच्या तुल्यबळ संघाशी भिडला. श्रुती मासले, तेजस्विनी मालगुडे, तन्वी व समृद्धी देशपांडे यांच्यासह संघातील मुलींच्या अप्रतिम खेळाने पंजाब संघावर एकतर्फी विजय मिळविला. महाराष्ट्र संघाने २५-८, २५-१२ व २५-१० असे तिन्ही सेट जिंकले.
दुसऱ्या दिवशीच्या सामान्यांचा निकाल असा : पुरुष संघ-केरळने तामिळनाडू, उत्तराखंडने हिमाचल प्रदेश, हरियाणाने पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशने ओरिसा, बिहारने तेलंगणा, पॉंडीचेरीने कर्नाटक, तामिळनाडूने चंदीगड व जम्मू-काश्मीर, हरियाणाने हिमाचल प्रदेश, पंजाबने उत्तराखंड, आंध्र प्रदेशने पॉंडीचेरी संघावर विजय मिळवत आपली घोडदौड सुरू ठेवली आहे.
महिला संघ : चंदीगडने दिल्ली, केरळने उत्तर प्रदेश, पंजाबने झारखंड, तेलंगणाने तामिळनाडू, दिल्लीने कर्नाटक, हरियाणाने मध्य प्रदेश व गुजरातने ओरिसा संघावर मात केली. राजस्थान संघास पुढे वाटचाल मिळाली आहे.
जितेन पंड्या (बिहार), शिराजन (तामिळनाडू), राहुल मुंदडा (उत्तर प्रदेश), महाराष्ट्राचे आदिनाथ कोल्हे, अंजली सरदेसाई, महेश शेडबाळे, दीपक चव्हाण, पी. आर. सावंत, अमोल गोरे या पंचांनी जबाबदारी पार पाडली. साहेबराव ठाकरे (अकोला), रेफरी बोर्ड कन्व्हेनर डॉ. सुनील चव्हाण (कुरुंदवाड), संजय बढे (अमरावती), कंट्रोल कमिटीचे सदस्य शिव नारायण (मध्य प्रदेश) हे सामन्यांचे नियोजन करत आहेत.
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
चौकट : आजचे (शुक्रवार) सामने..
आज चौथ्या दिवशी महाराष्ट्र मुलांचा संघ तामिळनाडू संघाशी लढणार आहे. हा सामना महाराष्ट्र संघासाठी ‘करो या मरो’ आहे. मुलींचा संघ उत्तराखंडशी भिडणार आहे. मुलींच्या संघांनी केरळ, दिल्ली व पंजाबवर मात केली आहे. मुलांचा संघ पहिल्या सामन्यात केरळकडून हरला असला तरी त्यांनी त्यानंतर जम्मू-काश्मीर व चंदीगडला मात दिली आहे. आज मुलींच्या केरळविरुद्ध दिल्ली व मुलांच्या आंध्र प्रदेश विरुद्ध कर्नाटक या तगड्या संघांत लढत होणार आहे. या स्पर्धेत मुलांच्यामध्ये पंजाब, केरळ, हरियाणा व दिल्ली तर मुलींच्यामध्ये महराष्ट्र, पंजाब, केरळ व राजस्थान हे संघ दमदार वाटचाल करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Is322b05265 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..