World Tourism Day 2022 : बीच शॅक्स परवानगीच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Tourism Day 2022
बीच शॅक्स पर्यावरण परवानगीच्या प्रतीक्षेत

World Tourism Day 2022 : बीच शॅक्स परवानगीच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी : पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने कोकणातील तीन किनारी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पर्यावरणीय परवानगीसाठी कोस्टल मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीकडे पाठविला आहे. यामध्ये रत्नागिरीतील आरे-वारे किनाऱ्याचा समावेश केला आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विविध संकल्पना कोकणात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये गोव्याच्या धर्तीवर बीच सॅक उभारण्याचा निर्णय घेतला होता. कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी ‘बीच शॅक’ धोरण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आखले होते. पायलट प्रोजेक्ट म्हणून कोकणातील आठ किनाऱ्यांची निवड केली होती. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील आरे वारे आणि गुहागर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली या किनाऱ्यांचा समावेश होता.

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवर तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. एका चौपाटीवर कमाल १० कुटी उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. बीच शॅक्स उभारण्यासाठी पर्यावरणाविषयक परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव कोस्टल झोन मॅनेजमेंटकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून लवकरात तो प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रत्नागिरीतील आरे-वारे किनारी दहा शॅक्स उभारण्याचे नियोजन केले आहे. तसेच पर्यटकांसाठी किनाऱ्यावर सर्व सुविधा केंद्रही उभारले जाईल. वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पार्किंग सुविधाही दिली जाणार आहे. यासाठी किनारी भागात किमान तीन एकर जागा अपेक्षित आहे.

आरे-वारे परिसरात हा प्रकल्प झाल्यास पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी स्थानिक व्यक्तींना ८० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील. या कुटींचे तीन वर्षांकरिता वाटप करण्याचे निश्‍चित झाले होते. एका कुटीचा आकार आकार १५ फूट लांबी आणि १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल. गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल. कुटी मिळणाऱ्या‍या व्यक्तीकरिता परवान्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

पाच जिल्ह्यांमधून १८० प्रस्ताव
पर्यटन संचालनालयाच्या कृषी पर्यटन केंद्र योजनेंतर्गत कोकणातील पाच जिल्ह्यांमधून १८० प्रस्ताव आले आहेत. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील १६ प्रस्तावांना प्रमाणपत्रेही दिली गेली आहेत. शेती करणाऱ्यांना पर्यटन व्यवसाय करावयाचा असल्यास संबंधितांना याचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये आठ खोल्या उभारण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी लागत नाही. त्यामुळे कोकणातून याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.

बीच शॅक्स उभारण्यासाठीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याला लवकरच परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे.
- हनुमंत हेडे, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, कोकण विभाग

टॅग्स :KokanTourisimTourism