पर्यटन उद्योग शाश्वत समृद्धीचा ..... ध्यास कोकण विकासाचा .... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटन उद्योग शाश्वत समृद्धीचा ..... ध्यास कोकण विकासाचा ....
पर्यटन उद्योग शाश्वत समृद्धीचा ..... ध्यास कोकण विकासाचा ....

पर्यटन उद्योग शाश्वत समृद्धीचा ..... ध्यास कोकण विकासाचा ....

sakal_logo
By

(धरू कास उद्योगाची ...........लोगो)

rat२७p२.jpg
५२९३१
प्रसाद जोग

पर्यटन उद्योग शाश्वत समृद्धीचा ..... ध्यास कोकण विकासाचा....


इंट्रो

कोकणातील दरडोई उत्पन्नवाढीस साहाय्य्यभूत ठरू शकणारा शाश्वत पर्यटनाचा हा विषय फक्त एका दिवसाचा नसून प्रत्येक पर्यटन व उद्योगस्नेही व्यक्तींनी ३६५ दिवस याचाच ध्यास घ्यायला हवा.पर्यटन स्थानिक जनतेला रोजगार मिळवून देणारे शाश्वत साधन आहे. उद्योजकीय नजरेतून प्रवाशांच्या, पर्यटकांच्या, निसर्गप्रेमींच्या गरजा लक्षात घेऊन जे आहे तसे, जिथून आहे तिथून व जी जी संसाधने, भूखंड जवळ आहेत त्यांचा नियोजनात्मक वापर करून कोकणात पर्यावरणस्नेही पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. अतिथ्यशिलता व उद्यमशीलता यांचा सुयोग्य मेळ घालू शकणारी "पर्यटनविद्या" जर आपण आत्मसात केली तर कोकणात असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा, निसर्गाचा योग्य वापर करून सर्वांना समृद्ध करणारी शाश्वत पर्यटनप्रणाली निर्माण करून कोकणला एक चांगलं टुरिस्ट डेस्टिनेशन नजीकच्या काळात निश्चितच बनवू शकतो.

- प्रसाद जोग,चिपळूण
-------------------------------------
प्रवास करणे, पर्यटन करणे या मागे पर्यटकांचे विविध हेतू, प्रयोजने असू शकतात; पण पर्यटकांना सर्वात शेवटी आपण केलेल्या प्रवासातील अनुभव आठवत असतात. हेच अनुभव जर चांगले असतील, दर्जेदार असतील तर पर्यटक पुन्हा पुन्हा असे अनुभव घेण्यासाठी अनुकूलता दर्शवतात व हेच खरे शाश्वत पर्यटनाचे सूत्र आहे. पर्यटक म्हणजे आपले अतिथी असून त्यांना ग्राहक म्हणून गुणवत्तापूर्ण व तत्पर सेवा दिल्यास व पर्यटनाच्या नवनवीन संकल्पना घेऊन ग्राहकांना अपेक्षित असलेल्या अनुभूती दिल्यास पर्यटनक्षेत्रातील उद्योजक लवकर नावारूपास येऊ शकतात. पर्यटनक्षेत्रात जेवढे महत्व ब्रॅण्डिंगला आहे तेवढेच किंवा त्याहून जास्त महत्व बॉण्डिंगला आहे.
कोकण पर्यटनातून महाराष्ट्राला, देशाला, जगाला आकर्षून घेऊ शकतो; पण त्यासाठी कोकणातील प्रत्येक घरात पर्यटनस्नेही वातावरण तयार व्हायला हवे. आपल्याकडील निसर्गाचा, आपल्यातील कलागुणांचा, उद्योजकीय भानाचा आपण यथोचित वापर केला तर कोकणात निश्चितच शाश्वत, समृद्ध पर्यटन बहरू शकते. पर्यटनक्षेत्राशी अन्य उद्योग संलग्न असल्यामुळे जर आपण ‘पर्यटनविद्येत’ पारंगत झालो तर रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी येथेच तयार करून स्वयंपूर्ण कोकणच्या दिशेने आश्वासक पाऊल टाकू शकतो.
महिला उद्योजिका पर्यटनक्षेत्रात मोठ्या हिंमतीने स्वत:च्या प्रकाशवाटा निर्माण करत आहेत.आलेल्या पै पाहुण्यांचे उत्साहाने स्वागत करणे, त्यांना आवडेल असा स्वयंपाक करणे त्यांचे सर्व हवे, नको अगत्याने बघणे, आपल्यातील कलात्मकतेने घर सजवणे, परसबाग फुलवणे, आपली संस्कृती, आपले खाद्यपदार्थ यांची यजमानी म्हणून सर्व अभ्यागतांना ओळख करून देणे, त्यांच्याशी मनमोकळेपणी गप्पा मारणे, वात्सल्याने सर्वांचे सर्व काही करणे, सुयोग्य पाहुणचार करून आलेल्यांना पर्यटनाची उत्तम अनुभूती देणे ही व अशी सर्व गुणात्मक कामे महिला उद्योजिका पर्यटनक्षेत्रात लिलया पार पाडून न्याहरी आणि निवास किंवा कृषिपर्यटन , ग्राम्य पर्यटन, निसर्ग पर्यटन यातून नक्कीच यशस्वीरित्या उद्योजकीय भरारी घेऊ शकतात.
आज अशाच मायलेकी जोडीने चालवत असलेल्या विद्या कोकण कृषी पर्यटन या छोटेखानी घरगुती उद्यमाची (होम स्टे) ची ओळख करून घेणार आहोत. विद्या सरखोत आणि त्यांची मुलगी गार्गी या दोघी मायलेकी चिपळूण-कराड रोडजवळील पिंपळी बुद्रुक येथे दीड एकर जागेत हे पर्यटनाचे मॉडेल राबवतात. महाराष्ट पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) अधिकृत न्याहरी व निवास केंद्र त्या उत्तमपणे चालवतात. विविध प्रकारची झाडे, जैवविविधतेचे राखलेले भान, साधे पण चविष्ट शाकाहारी जेवण, आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत व शांतता या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असून आतापर्यंत त्यांच्याकडे देश-परदेशातील पाहुणे येऊन पाहुणचार घेऊन अनुभव समृद्ध होऊन गेलेले आहेत.स्थानिक भागातील इतिहास, भौगोलिक परिस्थिती, पर्यावरण, परिक्षेत्रातील, जीवसृष्टीतील जैवविविधता, आयुर्वेदिक वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग, पक्षी-प्राणी यांची सखोल माहिती इथे दिली जाते. दसपटीमधील अज्ञात इतिहास, कोळकेवाडी धरण, अन्य धार्मिक स्थळे, देवळे यांची रंजक माहिती पर्यटकांना देण्यात येऊन पर्यटकांना पक्षीनिरीक्षणाचा आनंदसुद्धा घेता यावा म्हणून सहकार्य केले जाते.विद्या यांच्या म्हणण्यानुसार, कोकणात पर्यटनवाढीसाठी खूप मोठी संधी असून महिला उद्योजिकांनी, बचतगटातील सदस्यांनी पर्यटन व्यवसायात धाडसाने उतरून, स्वतःच्या पर्यटनविषयक संकल्पना आपल्या कुटुंबाच्या मदतीने आपल्या जागेत, शेतात, बागेत, आमराईत राबवल्या पाहिजेत.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)