''आर्य चाणक्य''कार ल. मो. बांदेकर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''आर्य चाणक्य''कार ल. मो. बांदेकर !
''आर्य चाणक्य''कार ल. मो. बांदेकर !

''आर्य चाणक्य''कार ल. मो. बांदेकर !

sakal_logo
By

swt२७६.jpg
52898
श्रीनिवास नार्वेकर

नाट्यनिपुण सिंधुदुर्ग

‘आर्य चाणक्य’कार ल. मो. बांदेकर !

- श्रीनिवास नार्वेकर

लीड
कोकणातली अनेक माणसं अशी होती, आहेत की, ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आणि काही करण्याच्या शक्यता असूनही त्यांनी आपल्या कोकणच्या लाल मातीमध्ये रुतून राहिलेलं पाऊल शहराच्या-किंबहुना कलेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, मुंबईच्या दिशेनं उचललं नाही. त्यांनी कोकणात राहूनच आपलं काम केलं आणि कोंकणात राहूनही ते काम महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचलं. नाट्यनिपुण सिंधुदुर्गच्या इतिहासातलं असंच एक महत्त्वाचं नाव-कोकणचा छोटा गडकरी म्हणून गणले गेलेले नाटककार ल. मो. अर्थात लक्ष्मण मोतिराम बांदेकर! नाटकवाल्यांसाठी त्यांची अधिक जवळची ओळख म्हणजे ''आर्य चाणक्य''कार ल. मो. बांदेकर!
..................
साधारण १९८५ च्या सुमारास लमोंच्या हातून एकूणच मराठी रंगभूमीसाठी भविष्यात फार महत्वाचं ठरणारं एक नाटक लिहिलं गेलं-शिखाबंधन! कालांतरानं त्या नाटकाचं नामांतर झालं ''आर्य चाणक्य''. सर्वप्रथम सावंतवाडीतल्या नाट्यदर्शन संस्थेच्या दिनकर धारणकर यांनी ते राज्य नाट्यस्पर्धेत केलं आणि ल. मो. बांदेकर हे नाव केवळ कोकणातल्याच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राच्या नाट्यवर्तुळात सर्वमुखी झालं. नाट्यदर्शनने केलेल्या प्रयोगामागोमाग ते कोल्हापूरच्या एका संस्थेनं केलं आणि त्यानंतर लगेचच मुंबईतल्या नामांकित ''आविष्कार'' संस्थेनं हे नाटक रंगमंचावर आणलं. अजित भगत यांनी ते दिग्दर्शित केलं आणि प्रमोद पवार यांनी ''आर्य चाणक्य'' साकारला. याच नाटकानं लमोंना हौशी नाटककाराचा ''नाट्यदर्पण'' पुरस्कार मिळवून दिला. त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम वाङ्‌मयनिर्मितीचा पुरस्कारही या नाटकाला मिळाला. या नाटकाचे ''आविष्कार''ने जवळपास पाचशेहून अधिक प्रयोग केले.
लमोंचे वडील मोतिराम बांदेकर यांना नाटकाचं प्रचंड वेड. त्यांच्यासोबत लहानपणापासूनच नाटकं बघणं सुरु झालं आणि राम गणेश गडकर्‍यांच्या नाटकांचा प्रभाव लमोंवर पडला. आर्य चाणक्य, सेकंड लिअर, ऑथेल्लो द सेकंड, अंबा, व्यासकन्या, कुंभ अमृताचा यासारख्या नाटकांतून लमोंवर असलेल्या गडकर्‍यांच्या भाषेच्या प्रभावाचा प्रत्यय येतो. भरजरी भाषावैभव हे जसं गडकर्‍यांच्या नाटकांचं वैशिष्ट्य होतं, तसंच आणि तेवढंच लालित्यपूर्ण आणि डौलदार भाषा हे लमोंच्या नाटकांचं वैशिष्ट्य होतं. नाटकासाठी आवश्यक असणारा क्राफ्ट त्यांना नेमका समजला होता. आपल्या लेखनातून दर्जेदार भाषावैभव जपणारे लमो जेव्हा ''केला कलकलाट काकांनी''सारखं अस्सल प्रहसन लिहितात, तेव्हा त्यांच्यातल्या भाषावैविध्याचीही खात्री पटते.
मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाच्या ५० वर्षांतल्या निवडक नाटकांमधील प्रवेश एकत्रित गुंफून त्यांनी ''रंगदर्शन'' नावाचा एक आगळा प्रयोग केला. यामध्ये संगीत, ऐतिहासिक, सामाजिक या सर्वच विषयांवरल्या नाटकांचे भाग होते. त्या कालखंडाचा एक नेमका प्रवास या प्रयोगातून लमोंनी मांडला. महाभारतातल्या सहा स्त्री व्यक्तिरेखांची तडफदार स्वगतं असलेला ''व्यासकन्या'' नामक प्रयोगही त्यांनी कागदावर उतरवला. यक्षगान आणि दशावतार या दोन कलाप्रकारांवर आधारीत ''लीला गौरीहराच्या'' या नृत्य-नाट्य प्रयोगाच्या संहितेचेही त्यांनी लेखन केलं. प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या आगळ्या प्रयोगाला प्रख्यात यक्षगान कलावंत शिवराम कारंथ यांचं मार्गदर्शन लाभलं होतं.
मी मागल्या दिनकर धारणकरांवरल्या लेखात लिहिताना नाट्यदर्शन, दिनकर धारणकर आणि ल. मो. बांदेकर हे समीकरण एकूणच सिंधुदुर्गच्या नाट्य इतिहासात फार महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. ''कुंभ अमृताचा'', ''सोनेरी सकाळ'' वगळता लमोंची बहुतेक नाटकं नाट्यदर्शन संस्थेनं रंगमंचावर आणली. त्यांचं दिग्दर्शन अर्थातच दिनकर धारणकर यांनी केलं. कोकणच्या नाट्य इतिहासाची ही तीन महत्त्वाची पानं आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नोकरी करत असतानाही त्यांनी आपलं नाट्यलेखनाचं आणि प्रचंड वाचनाचं वेड हातातून सुटू दिलं नाही. ''आर्य चाणक्य'' वाचल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी लमोंना उत्तम मराठीमध्ये सविस्तर विवेचन करणारं पत्र पाठवलं होतं; पण त्याचाही लमोंनी कुठे गवगवा केला नाही.
सिंधुदुर्गच्या नाट्येतिहासातल्या महत्त्वाबरोबरच ल. मो. बांदेकर हे नाव माझ्यासाठीही फार महत्त्वाचं आहे. एक तर आमचे अगदी घरगुती संबंध. सावंतवाडीत आमच्या दोघांच्या घरांमध्ये केवळ एका घराचं अंतर. थोड्या मोठ्यानं हाक मारली तर एकमेकांच्या घरात सहज ऐकू जाईल, इतकंच अंतर. त्यांच्या ''लीला गौरीहराच्या''मध्ये काही वेगळ्या पध्दतीने बदल करून ''जय जय गौरीहरा'' हा प्रयोग दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली होती आणि त्याचा पहिला प्रयोग आम्ही थेट शृंगेरीपीठात शंकराचार्यांसमोर केला होता. काही काळानंतर त्यांनी लिहिलेलं एक विनोदी नाटक विजूमामांना-विजय चव्हाणना घेऊन मी करणार होतो. सगळी जुळणीही झाली होती; पण नाही, नंतर वर्कआऊट झालं. या क्षेत्रात असं होत असतंच खरं. प्रत्यक्ष समोर येईल तेव्हा खरं!
मला नेहमीच वाटतं, लमोंसारखी प्रसिध्दीपराङ्‌मुख आणि मुंबईच्या कोलाहलापासून नि स्पर्धेपासून दूर राहणारी माणसं एक प्रकारे आदर्शही असतात आणि या अशा स्वभावामुळे मराठी रंगभूमीचं काहीअंशी नुकसानही होत असतं. हे नुकसान होऊ न देण्याची आणि लमोंसारख्यांची नाटकं जागती ठेवण्याची जाणीव आपण सर्वांनीच ठेवायला हवी.