
भजन नामस्मरणाचा सोपा मार्ग
52901
कुडाळ ः भजन स्पर्धेचे उद्घाटन करताना तहसीलदार अमोल पाठक. शेजारी मंदार शिरसाट, विजय देसाई, अमेय देसाई, अरविंद शिरसाट, शेख, अभी गावडे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
भजन नामस्मरणाचा सोपा मार्ग
तहसीलदार फाटक ः कुडाळात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः भजन ही आपली संत परंपरा आहे. भजन हा नामस्मरणाचा सोपा मार्ग आहे. श्री देव कुडाळेश्वर मंडळाने स्पर्धेच्या माध्यमातून गेली ४७ वर्षे अखंडितपणे या कलेचे जतन व संवर्धन केले असून हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन तहसीलदार अमोल फाटक यांनी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी येथे केले.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित अॅड. (कै.) अभय देसाई स्मृती ४७ व्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला येथील श्री देव कुडाळेश्वर रंगमंचावर भक्तिमय वातावरणात सोमवारी रात्री प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार पाठक यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उद्योजक विजय देसाई, अमेय देसाई, कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरविंद शिरसाट, नगरसेवक अभी गावडे, विनय वर्दे, परीक्षक शाहजान शेख, संजय दळवी, मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, महेश कुडाळकर, सुरेश राऊळ, जयराम डिगसकर, महेश राऊळ आदी उपस्थित होते. श्री. शेख यांनी श्री देव कुडाळेश्वर मंडळाचे कौतुक केले. उपनगराध्यक्ष शिरसाट यांनी भजन स्पर्धेने शतकाकडे वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. महेश कुडाळकर यांनी प्रास्ताविक केले. किशोर काणेकर यांनी स्वागत केले. स्पर्धेत २४ भजन संघ सहभागी झाले असून ४ ऑक्टोबरपर्यंत स्पर्धा चालणार आहे.