चिपळूण - सह्याद्रीच्या जंगलात 8 वाघांचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - सह्याद्रीच्या जंगलात 8 वाघांचा वावर
चिपळूण - सह्याद्रीच्या जंगलात 8 वाघांचा वावर

चिपळूण - सह्याद्रीच्या जंगलात 8 वाघांचा वावर

sakal_logo
By

वाघाचा देखणा फोटो घेणे

सह्याद्रीच्या जंगलात आठ वाघ
कॅमेऱ्यांनी रुबाब टिपला ः जोडीची कोकणामध्ये भ्रमंती
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः सह्याद्रीच्या डोंगररांगांत वाघांच्या अस्तित्वावर अखेर वनविभागाने कॅमेऱ्याच्या माध्यमातून मोहोर उमटवली आहे. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जंगलात ८ वाघांचा रुबाब छायांकित करण्यात आला आहे. हे वाघ मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जंगलात असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
गोवा आणि कर्नाटक भागातून काही वाघ कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात येतात. गुरांची शिकार होत असल्यामुळे काही भागात वाघ असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणी प्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली. जंगलातील पाणवठे आणि इतर ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले. त्यात मागील दोन वर्षांपासून सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या वाघांची भ्रमंती आढळळी. २०१४ पासून वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट ही संस्था कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकणात ये-जा करणाऱ्या वाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. या संस्थेला वाघांची एक जोडी कोकणात भ्रमंती करताना आढळली आहे. इतर सहा वाघ हे स्थानिक आहेत की, गोवा आणि कर्नाटकमधून येतात याचा शोध घेतला जात आहे. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या दरम्यान कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात २२ ठिकाणी प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवला गेला. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले गेले. यातून ही माहिती समोर आली आहे.

दृष्टिक्षेपात
२०१४ पासून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोध
प्रारंभी वाघांची एक जोडी कोकणात भ्रमंती करताना आढळली
इतर सहा वाघ स्थानिक की गोवा आणि कर्नाटकमधून येतात याचा शोध
२०२१ ते एप्रिल २०२२ दरम्यान कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात २२ ठिकाणी कॅमेरा ट्रॅप
सहा महिने वाघांच्या हालचालींवर लक्ष


कोट
वाघांची एक जोडी कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जंगलात आढळत असल्याचे वारंवार दिसत आहे. अन्य सहा वाघ हे कायमस्वरूपी याच भागातील आहेत की, गोवा आणि कर्नाटक भागातून येतात याचा अभ्यास सुरू आहे.
- गिरीश पंजाबी - जीवशास्त्रज्ञ वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट

कोकणातील संगमेश्‍वर, देवरुख, चिपळूणसह अन्य भागात असलेल्या घनदाट जंगलात वाघांची भ्रमंती असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागात वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जनावरांना तातडीने नुकसानभरपाई दिली जात आहे; मात्र वाघांचे अस्तित्व सिद्ध होणे ही आनंदाची बातमी आहे.
- विशाल माळी, विभागीय वनाधिकारी कोल्हापूर