वेंगुर्ला रॉक्समध्ये चार गुहांचा शोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ला रॉक्समध्ये चार गुहांचा शोध
वेंगुर्ला रॉक्समध्ये चार गुहांचा शोध

वेंगुर्ला रॉक्समध्ये चार गुहांचा शोध

sakal_logo
By

L52928
वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) ः येथे आढळलेली गुहा.
52929
गुहेमध्ये सापडलेले अपृष्ठवंशीय प्राणी.
52930
गुहेतील प्राण्यांचे निरीक्षण करताना अभ्यासक.


वेंगुर्ला रॉक्समध्ये चार गुहांचा शोध
सॅकॉन कक्षाकडून अभ्यास; कांदळवन कक्षाकडून संरक्षणासाठी पावले


राजेश कळंबटे/सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला किनाऱ्‍यावर रॉक्स प्रदेशातील सर्व्हेत चार गुहांचा शोध लागला आहे. त्यापैकी बर्न्ट आयलँडवरील पाखोली ढोल नावाच्या गुहेत २१ अपृष्ठवंशीय प्राण्यांची नोंद झाली असून, चार हजार ७०० पक्ष्यांची घरटी आढळली आहेत. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गुहांच्या अभ्यासामुळे त्यांचे संरक्षण करण्यासाठी कांदळवन कक्ष पावले उचलणार आहे.
मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास केला आहे. जानेवारी ते जून २०२० या कालावधीत सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) संस्थेतील संशोधक शिरीष मांची, गोल्डिन क्वाड्रोस आणि धनुषा कावळकर्ते यांनी चार गुहा शोधल्या. त्यांना बर्न्ट आयलँडवरील पाखोली ढोल या एकाच गुहेपर्यंत पोहोचता आले. गुहेचे प्रवेश, संधीप्रकाश आणि अंधार असे तीन विभाग झाले आहेत. पाकोळी ढोलमध्ये २१ अपृष्ठवंशीयांची नोंद झाली. त्यात कोळी, भुंगेरा, खेकडे, पतंग, फुलपाखरे, चतूर, रातकीडा (क्रिकेट), ख्रिसमस ट्री वर्म्स, सिल्व्हरफिश आणि बरनॅकल्स आदी प्रजातींचा समावेश आहे. या अभ्यासात पाच पृष्ठवंशीय सजीव यांसह पाकोळी, कबुतरे, मार्टिन असे तीन पक्षी, एक सस्तन प्राणी (घूस) आणि एक सरपटणारा प्राणी (छोटी पाल) आढळला. भारतीय पाकोळ्यांच्या घरट्यांसह ४७०० अन्य पक्ष्यांची घरटी तिथे आहेत. गुहांचा द्विमिती व त्रिमिती नकाशे संशोधकांनी तयार केले आहेत. वातावरण बदल, समुद्राची पातळी वाढल्याने गुहेच्या नाजूक परिसंस्थेला व त्यातील जैवविविधतेला धोका पोहोचण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. गुहांच्या संवर्धनाचे महत्त्व या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शाळा व महाविद्यालयात जनजागृती सुरू केली आहे.

काय आढळले?
* २१ अपृष्ठवंशीय प्राणी
* ४ हजार ७०० पक्ष्यांची घरटी
* चारपैकी एका गुहेपर्यंतच आले पोहोचता
* पर्यटनातून स्थानिकांना फायदा

वेंगुर्ला खडक द्वीपसमूहाच्या गुहेतील प्राणीसृष्टी समजून घेतानाच त्यातील अधिवास व त्यांना असलेला धोका यावर अभ्यास केला आहे. गुहांमधील परिसंस्था आणि पर्यायी उत्पन्नाच्या माध्यमातून स्थानिक समुदायाच्या शाश्वत विकासासाठी परिसंस्थेच्या संवर्धनाचे महत्त्वही समजून घेतले जात आहे.
- वीरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष

परिसंस्थेत अज्ञात प्रजाती
वेंगुर्ल्याचा द्वीपसमूह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. २० छोटी बेटे आहेत. पैकी न्यू लाइटहाऊस बेट, ओल्ड लाइटहाऊस बेट आणि बर्न्ट आयलँड ही तीन बेटे तुलनेने मोठी आहेत. उर्वरितांपैकी नऊ छोटी बेटे असून, पाण्याखाली आठ खडक आहेत. ही छोटी बेटे समुद्रातील महत्त्वाचे भाग आहेत, जे किनाऱ्‍यावरील नागरिकांसाठी नैसर्गिकरीत्या संरक्षक म्हणून काम करतात. वेंगुर्ला समुद्र परिसरात भारतीय पाकोळींचा वावर असल्याने तिथे एक विशिष्ट प्रकारची परिसंस्था तयार झाली आहे. त्यात अज्ञात व ओळख न पटलेल्या प्रजाती आहेत. वातावरण बदलामुळे गुहेतील अपृष्ठवंशीयांच्या विविधतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे पाणथळ जागांचे शास्त्रज्ञ गोल्डिन क्वाड्रोस यांनी सांगितले.