सदर ः कृष्णभक्त पारसवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः कृष्णभक्त पारसवी
सदर ः कृष्णभक्त पारसवी

सदर ः कृष्णभक्त पारसवी

sakal_logo
By

पान ६ वरून लोगोघेणे

संघर्षात तेजाळल्या तेजस्विनी.....लोगो

इंट्रो

कृष्णभक्तीत बुडून गेलेली पारसवी संतपदाला पोचली. भगवंताची हाक ऐकल्यावर आहे त्या अवस्थेत बाहेर जाणं यालाच परमभक्ती म्हणत असावेत. कदाचित कामालाच देव मानणाऱ्या आर्किमिडीजला तत्त्व सापडले म्हणजे भगवंतच भेटला. तो शोध पूर्ण झाला म्हणून तो युरेका म्हणत तसाच बाहेर पडला असेल का...?

- विशाखा हेमचंद्र चितळे, चिपळूण


कृष्णभक्त पारसवी

देवक राजाची रूपवान, गुणवान मुलगी पारसवी. पितामह भीष्मांनी तिचा विवाह विदुराशी लावला. विदुरांकडून कृष्णाबद्दल ऐकल्यावर तीही कृष्णाची भक्ती करू लागली. ती कृष्णभक्तीत इतकी रंगून जायची की, तिला आजूबाजूचे कसलेही भान राहात नसे.
महाभारत युद्ध टाळावं या हेतूने कृष्ण शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरात आला. दुर्योधनाने त्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. पंचपक्वांनांचे भोजन असणार होते. राजसभेतील काम झाल्यावर कृष्णाने विदुरांकडे जाण्याचे ठरवले. राजप्रासादातल्या झगमगाटापेक्षा त्यांचे साधेसे घर कृष्णाला जास्त प्रिय वाटले. दुर्योधनाने यथोचित स्वागत करूनही कृष्ण थांबत नाही म्हणून दुर्योधनाने कारण विचारले. श्रीकृष्णाने जे सांगितले ते फारच महत्त्वाचे आहे. कुणाचंही आतिथ्य स्वीकारण्याची तीन कारणं असतात. भाव, प्रभाव, अभाव. देव भावाचा भुकेला, तो भाव नक्कीच दुर्योधनाकडे नव्हता. त्याचा इतका प्रभाव नाही की, साक्षात भगवंताने त्याला घाबरावं. भगवंताकडे कशाचाच अभाव नाही की, ज्यासाठी त्याने त्या कृत्रिमतेत, स्वार्थात थांबावं.
याच न्यायाने विदूर आणि विदूर पत्नीकडे असलेला भाव इतका की, भगवंत प्रसन्न व्हावा. श्रीकृष्ण विदुराघरी पोचले तेव्हा विदूर घरात नव्हते. दार बंद होते. विदूरपत्नी पारसवी स्नान करत होती. कृष्णाने दार वाजवले आणि म्हणाला, मी कृष्ण आलोय. मला भूक लागली आहे. पारसवी इतकी परमभक्त की, दारी उभा राहून साक्षात कृष्ण म्हणतोय मला भूक लागली, हे ऐकून तिचे भान हरपले. ती होती तशाच अवस्थेत धावत सुटली. दार उघडले. कृष्णाला म्हणाली, आत ये आधी.
क्षणार्धात कृष्णाच्या लक्षात आलं, आपल्या भक्तीत आकंठ बुडाल्याने पारसवीला कपड्यांचंही भान नाहीय. आपला शेला पटकन त्याने तिच्या अंगावर टाकला. भगवंताचा शेलाच तो, त्याने तिचे सारे अंग झाकले गेले. तिने त्याला घरात आणले. मनात विचार एकच. त्याला खायला काय देऊ? त्याला बसायला पाट दिला, तोही उलटा. कृष्ण प्रेमाने उलट्या पाटावर बसला. घरात तिला केळ्यांचा फणा दिसला. आनंदाच्या भरात ती केळी सोलत होती. गरे फेकून देत होती. साली कृष्णाला भरवत होती. कृष्णाच्या लक्षात येऊनही तो काही बोलला नाही. कृतीमागची अपार भक्ती त्याने जाणली. थोड्या वेळाने विदूर घरी आले. त्यांनी पारसवीला भानावर आणले.आपण भगवंताला नीट खायला दिले नाही म्हणून पारसवी फुरंगटली. विदूर कृष्णाला नीट केळी सोलून देऊ लागला. त्यावर कृष्ण म्हणाला, पारसवीने भक्तीने भरवलेल्या सालींची गोडी या केळ्यांपेक्षा अवीट आहे. हे ऐकून पारसवी धन्य झाली.
काळ कुठलाही असो, त्या अवस्थेत पोचायलाही फार कष्ट घ्यावे लागतात. तरच भगवंत भेटतो. तो भक्ताकडे आपणहून येतो.भगवंताची वस्त्र ल्यावीत अशा भाग्यवान स्त्रिया बहुतेक दोनच असाव्यात. एक द्रौपदी जिला संकटात भगवंतांनी मदत केली, दुसरी पारसवी. जिच्या भक्तीने प्रसन्न होऊन आपणहून त्यांनी आपलं वस्त्र दिलं. राजप्रासादातील सुख नव्हे तर देवाला भक्ताचा निर्मळ भाव आवडतो हे पारसवीने दाखवून दिले.