देवरूख ः पशुधनाच्या आरोग्यासाठी सोयीसुविधा अपुऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ः पशुधनाच्या आरोग्यासाठी सोयीसुविधा अपुऱ्या
देवरूख ः पशुधनाच्या आरोग्यासाठी सोयीसुविधा अपुऱ्या

देवरूख ः पशुधनाच्या आरोग्यासाठी सोयीसुविधा अपुऱ्या

sakal_logo
By

पशुधनाच्या आरोग्यासाठी
संगमेश्वरमध्ये सोयीसुविधा अपुऱ्या
अधिकाऱ्यासह एकूण २३ पदे रिक्त
देवरूख, ता. २९ ः एकीकडे दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी शासन दरबारी विविध योजना राबवल्या जातात; मात्र पशुधनाच्या आरोग्यासाठी किती आरोग्याच्या सोयीसुविधा पुरवल्या जातात हा मात्र संशोधनाचा विषयच बनला आहे. संगमेश्वर तालुक्याचा विचार करता राज्य शासनाचे आणि जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय दवाखाने २३ आहेत; मात्र अधिकाऱ्यांची संख्या तुटपुंजी असल्याने कार्यरतांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक रिक्त पदांमुळे कसरतच करावी लागत आहे.
संगमेश्वर तालुक्यात गाईंची एकूण संख्या ३० हजार ७३ तर म्हैशींची संख्या ४ हजार ३६७ एवढी आहे. सध्या लम्पी आजाराने डोकं वर काढल्याने लसीकरण मोहीम राबवली जात आहे. सोमवारी (ता. २६) पर्यंत तीन हजार इतके लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रभारी पशुधन पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांनी दिली. तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ८ दवाखाने आहेत. यात श्रेणी एकचे ३ तर श्रेणी २चे पाच आहेत. हे दवाखाने सुस्थितीत आहेत. या विभागातील दवाखान्यात आवश्यक असलेली पशुधन विकास अधिकाऱ्यांची चारही पदे रिक्त आहेत तर पर्यवेक्षकांची ४ पदे रिक्त अशी एकूण आठ पदे रिक्त आहेत. याबरोबरच राज्य शासनाच्या १५ दवाखान्यांसाठी आवश्यक असलेली १५ पदे रिक्त आहेत. यात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन एक पद रिक्त तर पर्यवेक्षकांची १५ पैकी तब्बल १४ पदे रिक्त आहेत. अशी दोन्ही मिळून २३पदे रिक्त असल्याने कार्यरतांवर जादाचे काम पडत आहे. या विभागाचे काही दवाखाने भाडेतत्वावरील इमारतीत आहेत.
तालुक्यात सध्या लम्पिच्या लसीकरणासाठी ज्यादाचा सुशिक्षित स्टाफ बोलावण्यात आला आहे; मात्र एका व्हाईलमध्ये १०० डोस असल्याने जास्त पशुधन असलेल्या मोठ्या गावात पहिल्यांदा लसीकरण सुरू आहे तर काही गावात जनावरे चरण्यासाठी सोडण्यात येत असल्याने लसीकरणासाठी अडथळा निर्माण होत आहे.
------------------------------
चौकट
लसीकरण नको, अशीही भूमिका
काही पशुपालक लसीकरण नको, अशीही भूमिका घेत आहेत तर काहीजण नकारदेखील देताना दिसत आहेत. लसीकरण मोहिमेला जाताना त्या गावातील ग्रामसेवक आणि सरपंच यांना आदल्या दिवशी पूर्वकल्पना दिली जाते तरीही काही गावातून सहकार्य होताना दिसत नाही. याचा विचार करून ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रभारी पशुधन पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.