साखरपा ः तुणतुणे वादन करत देवीची सेवा करण्याची चार पिढ्यांची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः तुणतुणे वादन करत देवीची सेवा करण्याची चार पिढ्यांची परंपरा
साखरपा ः तुणतुणे वादन करत देवीची सेवा करण्याची चार पिढ्यांची परंपरा

साखरपा ः तुणतुणे वादन करत देवीची सेवा करण्याची चार पिढ्यांची परंपरा

sakal_logo
By

rat29p13.jpg ः KOP22L53333 साखरपा ः तुणतुणे वादन करताना रसाळ कुटुंबीय.

तुणतुणे वादनाद्वारे चार पिढ्या देवीची सेवा
रसाळ कुटुंबाने जपली परंपरा ; शहाजींच्या काळी स्वराज्याचे हेर
साखरपा, ता. २९ ः कोकणात नवरात्रात तुणतुणे वादनाची परंपरा मोठी आहे. नऊ दिवस प्रत्येक घरी जाऊन देवीची आरती गाण्याची ही परंपरा सरवदे समाज गेली अनेक वर्षे जोपासत आला आहे. अशांपैकीच एक असलेले विजय रसाळ ही परंपरा जोपासत आहेत.
नवरात्र म्हटलं की, घराघरात येणारे देवीचे भुत्ये आठवतात. हातात तुणतुणे घेऊन देवीची आरती सादर करणाऱ्या या भुत्यांच्या परंपरेला मोठा इतिहास आहे. ही परंपरा सुरू केली ती शहाजी राजांनी. त्या वेळी हे भुत्ये आरती म्हणण्याच्या बहाण्याने शत्रूच्या गावांमध्ये फिरून तेथील गुप्त माहिती स्वराज्यात आणत असत. देवीचे भुत्ये म्हणून वावरतांना स्वराज्याचे हेर म्हणून ते काम करत असत.
हेरगिरीची परंपरा मागे पडली असली तरीही नवरात्रात तुणतुणे वादन करत आरती गाऊन देवीची सेवा करण्याची ही परंपरा आजही सुरू आहे. मुळचे चाफवली गावाचे पण आता दाभोळे नजीकच्या बोरिवले गावात स्थायिक झालेले विजय रसाळ हे ही परंपरा त्यांच्या चौथ्या पिढीत जोपासत आहेत. त्यांच्या पणजोबांनी तुणतुणे वादनाची परंपरा सुरू केली. त्यानंतर त्यांचे वडील अनंत रसाळ आणि चुलते दत्ताराम यादव यांनी ही परंपरा सुरू ठेवली. सध्या त्यांचा पुतण्या सौरभ हा विजय यांच्याबरोबर जाऊन त्यांना साथ देतो.